औषधी बगीचा : कोरफड

सुजाता गानू टिकेकर
आपली त्वचा फार नाजूक असते. बाहेरच्या हवेचा, मग ती कोणत्याही ऋतूतील असो, लगेचच परिणाम आपल्या त्वचेवर होतो. आजकाल प्रदूषण तर इतके आहे की, त्यातील अचानक बदलांमुळे हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी, भेगायुक्‍त आणि खाजरी बनते; तर उन्हाळ्यामध्ये तिला उष्णतेमुळे डाग, पुरळ, फोड यांचा त्रास होतो. ऋतूमधील सतत बदल आणि हानिकारक बाह्य घटकांमुळे त्वचेचं नैसर्गिक रूप पालटतं. त्यामुळे आपल्या सौंदर्यात, व्यक्‍तिमत्त्वात बाधा येते. म्हणूनच आपली त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी तिची काळजी घेणं आवश्‍यक आहे.

त्वचेची काळजी घेणारी एक बहुगुणी, बहुउपयोगी अशी वनस्पती आयुर्वेदात आहे. जिचे नाव आहे कोरफड. कोरफडीचे औषधी गुण अनेक संशोधनानी सिद्ध करून दाखवले आहेत. आफ्रिका, आशिया, युरोप आणि अमेरिका या खंडांमधील कोरड्या प्रदेशात ही अतिगुणकारी वनस्पती वाढते. ख्रिस्तपूर्व 1500 सालातही कोरफडीचा वापर केला जात असल्याचे उल्लेख आहेत. इजिप्तमधील लोक कोरफडीचा उल्लेख अमरत्वाची वनस्पती असा करीत असत. कोरफड हे इजिप्तची सौंदर्यवती राणी क्‍लिओपात्राच्या सौंदर्याचे रहस्य होते, अशी एक दंतकथा आहे. बायबलमध्येही कोरफडीविषयी बरेच काही लिहिले गेले आहे. तारुण्य राखण्याचा कोरफडीत गुण आहे.

इंग्रजीत कोरफडीला ऍलोव्हेरा तर हिंदीत घीक्वर बंगालीत घृतकुमारी गुजराथीत कुंवर म्हणतात. ती देठविरहित टोकदार पानांची दिसायला कॅक्‍टससारखी लिली फॅमिलीतील परंतु कांदा, लसूण व ऍसपरॅगस वर्गातील आहे. उग्र वास व कडू चव असलेल्या गरामुळेच ह्याचे नाव ऍलोव्हेरा अर्थात चमकणारा कडू गर असे पडले आहे. हा मूळ अरेबिक शब्द आहे.
कोरफड म्हणजे त्वचेची संजीवनी आहे.

कोरफडीचा वापर अनेक औषधांत व सौंदर्यप्रसाधनात केला जातो. तसेच तिचा गर किंवा रसही खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोरफड ही फक्‍त भारतीयांनाच नव्हे, तर इजिप्शियन, रोमन, ग्रीक, अरबी इत्यादी संस्कृतीमध्येही लोकप्रिय आहे. हजारो वर्षांपासून जगातील नावाजलेले वैद्य व डॉक्‍टर्स तिचा वापर करत आले आहेत.

कोरफडीमध्ये 99 टक्‍के ते 99.5 टक्‍के पाण्याचा अंश, असून घन भागात 75 विविध घटकपदार्थ आहेत. जसे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, एनझाइम्स, साखर, फिनॉलिक कंपाउंडस, लिगनिन, सॅपनिन्स, स्टिरॉल्स, अमिनो ऍसिडस आणि सॅलिक ऍसिड. कोरफडीच्या पानामध्ये 75 पेक्षाही अधिक जैविकदृष्ट्या कार्यरत असणारे घटक असतात.
कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन ड व क सोडल्यास जवळजवळ सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स उपलब्ध आहेत, तर साखरेत मोनॉपॉली व म्यूकोपॉली सॅकरिज्स असे प्रकार उपलब्ध आहेत.

कोरफडीचे उपयोग :

 • सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळू शकते.
 • परक्‍त वाहताना थांबवणे किंवा जखमांवर उपयोग होतो.
 • भाजलेल्या जखमांना थंडावा देते
 • निद्रानाशावर डोक्‍यास कोरफड जेल लावल्यास फायदा होतो.
 • पोटात घेतल्यास आतड्यांची आतून स्वच्छता होते.
 • त्वचेची स्वच्छता, डाग, पुटकुळ्या आणि सुरकुत्यांवरही उपयोगी.
 • ठराविक हवामानामुळे होणाऱ्या सर्दी खोकल्यासाठी हिचा नियमित पोटातून वापर चांगलाच असतो.
 • कांतीचा रुक्षपणा, घट्टपणा, सैलपणा अर्थात थुलथुलीतपणा ह्यावर उपयोगी असते.
 • कोरफडीतील सॅपोनिन्समुळे बॅक्‍टेरिया, व्हायरस व बुरशीवर तीव्र परिणामकारक असल्याने कातडींच्या आजारावर जसे एक्‍झिमा इत्यादीवर उपयुक्‍त असते.
 • भाजणे, खरचटणे, कापणे, किडा-मुंगी चावणे, जखमा आणि इतर काही गोष्टींमुळे त्वचेच्या टिश्‍यूवर जे परिणाम होतात, त्यावर कोरफड हे हमखास गुणकारी आहे.
 • कोरफडीच्या पानाच्या आतील बाजूस असलेल्या अर्धपारदर्शक जेलमध्ये दाहप्रतिबंधक गुणधर्म असतात. त्वचेमधील बाधित टिश्‍यूवर उपचार करून नवीन टिश्‍यू निर्माण करण्याचे कार्य या जेलमध्ये आहे.
 • कोरफडीमुळे बाष्पीभवनाच्या नैसर्गिक प्रक्रियेला अटकाव होतो आणि त्यामुळे वातावरणातील ओलावा तिच्यात शोषला जातो.
 • कोरफडीमुळे त्वचेमध्ये ओलावा येतो. त्वचेच्या खराब झालेल्या टिश्‍यूवर उपचार होतो, त्याचप्रमाणे मुरुम-पुटकुळ्या, काळी वर्तुळे, तांबडे चट्टे (रॅश), किरकोळ कापणे-भाजणे जखमा आणि ऍलर्जिक त्वचा विकारांमध्ये कोरफडीचा उपयोग होतो. कोरफड जेलमध्ये निरोगी त्वचेसाठी आवश्‍यक असे ई जीवनसत्त्व असते.
 • सोरायॅसिससारख्या त्वचेचे पापुद्रे काढणाऱ्या विकारावर कोरफड उपयुक्‍त आहे.
 • पाळीच्या विकारात-अंगावरून कमी जाणे, अनियमित पाळी व पॉलिसिस्टीक ओव्हरी सारख्या विकारात 1/2 ते 1चमचा कोरफड चूर्ण सकाळी नाश्‍त्यानंतर दुधातून किंवा साखरेच्या पाकातून घेणे- कमीत कमी 3 महिने. मात्र गरोदरपणी घेऊ नये.
 • यकृताची कमजोरी-पाव चमचा पावडर दुधात वा पाकात घेणे.
 • रक्‍तशुद्धीसाठी – पाव चमचा पावडर दुधात वा पाकात घेणे. अशा या गुणकारी कोरफडीचा अनेक सौंदर्यप्रसाधने व औषधी बनवणारे व्यावसायिक नवनवीन उत्पादने घेऊन बाजारात येत आहेत. आपल्या बागेतच किंवा घरातील कुंडीत ही जर कोरफड लावली तर डास, चिलिटे तर पळतीलच शिवाय कोरफडीच्या रूपाने एक औषधच घराच्या दारात हजर राहील.

कोरफडीचा रस करण्याची पद्धत –

– कोरफडीचा रस तयार करत असताना कोरफडीची रूंद पसरट असलेली पाने घ्यावीत. ती किंचित गरम करून कापावीत व त्यातील गर काढावा. या गराचे कापलेले तुकडे स्वच्छ कापडात घेऊन पिळून रस काढावा व तो प्यावा. हा रस खालील व्याधीत उपयोगी पडतो.

– यकृतविकार, अपचन, भूक कमी होणे, बद्धकोष्ठता, पित्त, कफ, व मुळव्याध, अपेक्षीत लाभ होताच हा रस घेण बंद करावे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे कोरफडीच्या चिकावर ताजेपणीच प्रक्रिया करून त्याचा रस किंवा गर काढून त्यावर प्रक्रिया करणं आवश्‍यक आहे. ह्यालाच जेल असे म्हणतात. गराचे चौकोनी तुकडे कापून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवूनही उपयोग होऊ शकतो.

– अजून एक लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे या उत्पादनांमध्ये मुद्दाम लावलेल्या आणि काळजीपूर्वक मशागत केलेल्या उत्तम दर्जाच्या कोरफडीच्या पानांचाच समावेश हवा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×