…और गंभीरने कुछ ऐसा कहा की पाकिस्तानी हो गये चूप!

दुबईमध्ये आशिया चषक स्पर्धेत 23 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धक पुन्हा समोर आले आणि या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा पराभव केला. दोन्ही संघांचे या स्पर्धेतील कमीत-कमी एक सामना 25 सप्टेंबरला बाकी आहे. त्यानंतर सर्व काही ठीक राहिले तर आशियामधील याच दोन क्रिकेट महासत्ता आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 28 सप्टेंबरला पुन्हा आमने-सामने होतील आणि पुन्हा सुरु होईल प्रसिद्धी आणि टीआरपीचा अजब खेळ.

भारत-पाकिस्तान सामना म्हणजे दोन्ही देशवासियांसाठी सुट्टीचा दिवस असे स्वरूप असते. हाताची सर्व कामे बाजूला ठेऊन सर्व क्रीडाप्रेमी हे सामने खूप उत्सुकतेपोटी पाहतात. जेथे क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव समजले जाते तेथे असे होणे हे काही नवल नाही. परंतु, मागील काही वर्षात या दोन संघात द्विपक्षीय मालिका होत नाहीत. त्यामुळे हे संघ फक्त अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अश्‍या स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. त्यानंतर प्रसारमाध्यमे खूप चवीने या सामन्यासाठी दिग्गज मंडळी बोलावून आपल्या वृत्तवाहिन्यांवर कार्यक्रम घेतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृत्तवाहिन्यांवर आपला टीआरपी वाढवण्यासाठी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी दिग्गजांची मोठी फौज बोलावली जाते. 23 सप्टेंबरला झालेल्या सामन्याच्या अगोदरदेखील बहुतेक सर्व मोठ्या वृत्तवाहिन्यांनी हाच हातखंडा वापरला. याच्या पुढे जाऊन एका हिंदी वृत्तवाहिनेने तर पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीशी संपर्क केला आणि गौतम गंभीर आणि शाहीद आफ्रिदी या दोन क्रिकेटर्सचा संवाद घडवून आणला. त्यांच्यात प्रेमाने ‘शाब्दिक युद्ध’ झाले. ते खाऊच चवीने दाखवले गेले. ‘देखिये भारत-पाकिस्तान मॅच से पहले गंभीरने दिया ऐसा जवाब की पूरे पाकिस्तानी हो गये चूप’ अशी टॅगलाईन आणि त्याच स्वरुपात चित्रे दाखवून आपली टीआरपीची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ट्विटमधील स्पेलिंग मिस्टेकची चर्चा दिवसभर यावर चालू असते.

भारत-पाकिस्तान सामन्याला प्रसिद्धीचा मंच म्हणून देखील अनेक आजी-माजी खेळाडू पाहत असतात. संघातील खेळाडू आपल्या कामगिरीने यावर आपली छाप पडण्याचा प्रयत्न करत असतात. तर काही माजी खेळाडू वादग्रस्त वक्तव्ये करून आपली उपस्थिती दर्शवतात. ‘हा’ संघ विजयाचा दावेदार ! असे साधे वाक्‍य म्हणून देखील ते वाद ओढवून घेतात आणि पुन्हा चर्चित होतात. भारत- पाकिस्तान मधील राजकीय सत्ता, कट्टर धार्मिक समर्थकांची वाढती संख्या, सैनिकांचे बलिदान, अतिरेकी हल्ले, घुसखोरी, स्वत्रंत राज्याच्या घोषणा या सर्व बाबी पुन्हा या सामन्यांच्या निमित्ताने पुन्हा वाहिन्यांवर दिसू लागतात.

आपल्या देशाचा संघ जिंकल्यावर लोक रस्त्यांवर येऊन जल्लोष कारतात. भारत-पाकिस्तान या सामन्यानंतर होणारी फटाकेबाजी अन्य प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवल्यावर कधीच दिसत नाही. एखादा सामनाच सोडा अन्य देशाविरुद्ध मालिका जिंकल्यावर देखील फटाकेबाजी होण्याचे प्रमाण अत्यल्प असावे. ऐन गणेश विसर्जनाच्या भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकला याची घोषणा दिली जाते. त्यानंतर अनेक दिवस मनाच्या कोणत्या कोपऱ्यात दडलेली देशभक्ती देवाच्या मिरवणुकीत समोर येण्याच्या घटनाही घडतात. अन्य देशाविरुद्ध सामना जिंकल्यावर अशीच घोषणा झाली असती की नाही हा प्रश्न आहे.

‘पाकिस्तान विरुद्ध सामना जिंका, विश्वचषक हरला तरी चालेल’ असे म्हणणारे प्रशंसक आपणाला खूप दिसतील. प्रसारमाध्यमे आणि अनेक कट्टर समर्थक या सामन्यांना वेगळे महत्व प्राप्त करून देण्यात नेहमीच यशस्वी होतात. या दोन देशातील सामन्यांच्या भोवतालच्या या फुग्यातील हवा कधी निघेल हे माहिती नाही परंतु या सामन्यांना मिळणारे महत्व निश्‍चित कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांनी आपले हीत आणि स्वार्थ बाजूला ठेऊन काम करणे गरजेचे आहे.

– राजकुमार ढगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)