ओगलेवाडी पोलीस दूरक्षेत्र कायमच कुलूपबंद

अवैध धंद्यांना ऊत : नागरिक त्रस्त

जहॉंगिर पटेल
ओगलेवाडी दि. 26 – ओगलेवाडीसह परिसरातील चौदा गावांमधील गावगुंड व अवैध धंद्यांवर चाप बसविण्यासाठी सुरू करण्यात आलेले ओगलेवाडी पोलीस दूरक्षेत्र नेहमीच कुलूपबंद असल्याचे दिसते. त्यामुळे परिसरात अवैध धंद्याना ऊत आला आहे. या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून पोलीस दूरक्षेत्र असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहे. या कुलूपबंद पोलीस दूरक्षेत्रासमोर अनेक भटकी कुत्री बसलेली दिसतात. जणू काय पोलीस दूरक्षेत्राची राखणच ते करत असल्याचे वाटते. या दूरक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर कराड-विटा रस्त्यावर एका पडक्‍या घरात राजरोसपणे अवैध दारूधंदे अनेक दिवसांपासून सुरू आहेत. याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याबाबत लक्ष घालून पोलीस दूरक्षेत्र पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
कराड शहरालगत असणारे ओगलेवाडी हे कराड-विटा मार्गावरील महत्त्वाचे केंद्र आहे. परिसरातील गावांमधील लोकांचा येथे व्यवसायाच्या निमित्ताने नेहमी राबता असतो. परिसरातील सुमारे बारा ते चौदा गावचे लोक या बाजारपेठेत दररोज येत असतात. येथे महत्त्वाची तीन मोठी विद्यालये आहेत. हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. रस्त्यांवर नेहमी विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यातच वडाव व्यावसायिक वेगाने येत असतात. यातून लहान-मोठे अपघातही घडतात. मात्र पोलीस दूरक्षेत्र बंद असल्याने तिकडे कोणी वळत नाही. ओगलेवाडी सह परिसरात मोठया प्रमाणात अवैध धंद्याना व गुन्हेगारीला ऊत आला आहे. मात्र पोलिसांच्या कारवाईविषयी साशंकता निर्माण झाली आहे. तक्रारी देण्यासाठी येणाऱ्या लोकांना हेलपाटे मारावे लागतात. पोलीस दूरक्षेत्र नेहमी का बंद असते असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. याबाबत काही उपययोजना होणे गरजेचे आहे.
ओगलेवाडीचा विकास झपाट्याने वाढत असला तरी या भागातील गुन्हेगारीही तितक्‍याच झपाट्याने वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दहा ते बारा गावची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बाजारपेठेत अवैध व्यवसायही मोठया प्रमाणात चालत असल्याचे आढळते. मात्र याकडे पोलीसांची डोळेझाक होत आहे. या परिसरात नेहमीच लहान मोठया चोऱ्या होत असतात. मात्र या चोऱ्यांचा तपासही तितक्‍याच धिम्या गतीने केला जातो, परिणामी तक्रार देण्यापेक्षा न दिलेलीच बरी अशी लोकांची भावना झाली आहे.
येथील कराड-विटा रस्त्यावर एका पडक्‍या घरात राजरोसपणे अवैध दारूधंदे सुरू आहेत. याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस दूरक्षेत्राच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणारी ही अवैध दारूविक्री बंद होणार का असा सवाल नागरिकातून केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)