ऑस्टिओआर्थरायटिस आणि अपंगत्वाशी जुळवून घेणे 

डॉ. नरेंद्र वैद्य 
डॉ. महेश कुलकर्णी 

ऑस्टिओआर्थरायटिससारख्या स्नायू आणि हाडाच्या सांगाड्याशी निगडित (मस्क्‍युलोस्केलेटल) आजारांमुळे येणाऱ्या अपंगत्वाचे प्रमाण मागील दोन दशकांमध्ये 79.7 टक्क्‌यांनी वाढले आहे. महाराष्ट्रात मस्क्‍युलोस्केलेटन आजारामुळे होणारे डीएएलवाय मागील दोन दशकांमध्ये राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत वाढले आहेत. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्टिओआर्थरायटिससारख्या मस्क्‍युलोस्केलेटल आजारांमुळे येणाऱ्या अपंगत्वामुळे आयुष्यातील महत्त्वाची वर्षे गमावणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. सन 2025 पर्यंत भारत ऑस्टिओआर्थरायटिसची राजधानी ठरणार असून 60 दशलक्षपेक्षा अधिक लोकांवर त्याचा परिणाम होईल असा अंदाज आहे.

सरकारच्या अहवालानुसार 1990 ते 2016 या कालावधीत डीएएलवाय म्हणजे अपंगत्वासह जगाव्या लागणाऱ्या आयुष्याला कारणीभूत ठरणाऱ्या आजारांमध्ये मस्क्‍युलोस्केलेटल आजार 13 स्थान वर सरकत 32 व्या स्थानावरून 19 व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्टिओआर्थरायटिससारख्या मस्क्‍युलोस्केलेटल आजारांमुळे होणाऱ्या अपंगत्वाचे प्रमाण मागील दोन दशकांमध्ये 79.7 टक्क्‌यांपर्यंत वाढले आहे.

आरोग्याच्या स्थितीसाठी डीएएलवायचे गणन लोकसंख्येतील अकाली मृत्यूमुळे आयुष्याची गमावलेली वर्षे (वायएलएल) आणि आरोग्याची स्थिती किंवा त्याच्या परिणामी अपंगत्वामुळे गमावलेली वर्षे (वायएलडी)ची बेरीज या स्वरूपात केले जाते. मागील 20 वर्षांमध्ये भारतात असंसर्गजन्य आजारांमुळे (एनसीडी) आणि दुखापतींमुळे डीएएलवायचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले. विद्यमान पुराव्यांमधून हे दिसते की भारतात एपिडेमिओलॉजिकल संक्रमण होत असून ऑस्टिओआर्थरायटिससारख्या असंसर्गजन्य रोगांच्या (एनसीडी) ताणाचे प्रमाण खूप वाढू लागले आहे.

ऑस्टिओआर्थरायटिस हा अत्यंत सर्वसामान्य सांधेदुखीचा आजार असून तो 22 ते 39 टक्के भारतीय लोकसंख्येत दिसून येतो. शारीरिक व्यायामात प्रचंड घट, लठ्ठपणा वाढणे, कॅल्शियमची कमतरता असलेला आहार, अत्यंत गंभीर प्रमाणातील व्हिटॅमिन डीची कमतरता आणि हाडांची कमी घनता यांच्यामुळे गुडघ्यांच्या टिश्‍यूंचे लवकर घर्षण आणि नुकसान होते. तसेच ऑक्‍युपेशनल धोक्‍यांमध्ये, रस्त्यांवरील अपघात आणि एथलेटिक अपघात यांच्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसमुळे डीएएलवायमध्ये वाढच होऊ लागली आहे.

सन 2025 पर्यंत भारतातील 65 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील 80 लोकसंख्येला सांध्यांच्या प्रचंड घर्षणामुळे ऑस्टिओआर्थरायटिस प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेला दिसेल. यातील 40 टक्के लोकांना गंभीर ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची शक्‍यता असून त्यामुळे रोजच्या कामातही अपंगत्व आल्याचे त्यांना जाणवेल.

आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यावर परिस्थिती अधिक गंभीर होते. आजाराबाबत जागरूकता वाढत असताना आणि गुडघ्याच्या यशस्वी इम्प्लान्टचे पुरावे उपलब्ध असल्याने रुग्णांना वेळेत निर्णय घेण्यात साह्य लाभते. मात्र, आजही शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे होण्यातील शंकांमुळे रूग्णांना भीती वाटते. लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, पुणे येथे वर्षाला सुमारे 3000 सांधेबदल शस्त्रक्रिया केल्या जातात आणि त्यातील फक्त 2 टक्के रूग्णांना 15 वर्षांनंतर सुधारणा शस्त्रक्रिया करावी लागते असे दिसून आले आहे.

मागील एका दशकभराच्या कालावधीत तरूण रूग्णांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिसचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. क्‍लिनिकल माहितीनुसार जवळपास 20 टक्के ऑस्टिओआर्थरायटिसचे रूग्ण 45-50 वर्ष वयोगटातील आहेत. टोटल नी रिप्लेसमेंट (टीआरके) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आलेल्या तरूण रूग्णांनी भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. आज सुमारे 95-97 टक्के टीआरके शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. गुडघेबदलाबाबत वाढती जाणीवजागृती आणि माहितीची साध्यता हे आपल्या शंका दूर करण्यासाठी जास्तीत जास्त रूग्णांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेण्यामागील प्रेरक घटक आहेत.

परंतु, भीतीमुळे शस्त्रक्रियेचा पर्याय निवडणाऱ्या लोकांचे प्रमाण अजूनही या आजाराचे निदान झालेल्या लोकांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस, उपलब्ध असलेले अद्ययावत उपचारांचे पर्याय यांच्याबाबत जनतेतील जागरूकतेमध्ये वाढ होण्याची आणि टोटल नी रिप्लेसमेंट (टीकेआर) शस्त्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारची गैरसमज/भीती दूर करण्याची गरज आहे.

रूग्णाच्या वेदना कमी करणे, रूग्णाचे समाधान करणे, त्यांना नैसर्गिक हालचाली करण्यासाठी प्रेरणा देणे या हेतूंनी तयार कण्यात आलेल्या नवीन आणि अद्ययावत गुडघ्यांच्या इम्प्लांटची उपलब्धता यांच्यामुळे रूग्ण आता कोणत्याही भीतीविना आपले आयुष्य जगू शकतात. तसेच, ऑस्टिओआर्थरायटिससारख्या एनसीडीने समोर ठेवलेल्या आव्हानांचा सामना प्रत्येक राज्यातील त्याच्या उद्भवाच्या प्रमाणात करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)