ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी सावध असणे गरजेचे : स.पो.नि गजानन कदम

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) –

सध्या ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढले आहे, या ऑनलाइन खरेदीत आता फसवणूक होत आहे. त्यामुळे ऑनलाइन संकेतस्थळाची खात्री करा. खरेदी करताना आपल्या कार्डची माहिती देऊ नका. शक्‍यतो “कॅश ऑन डिलिव्हरी’ हा पर्याय निवडा. तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा लकी विजेते ठरला आहात, अशा व्हॉटस्‌ऍप मेसेजवर व एसएमएसवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केले.

सायबर क्राईम सुरक्षा जनजागृती कार्यक्रमांतर्गत आज शिवतेज हॉलमध्ये पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे उपस्थित होते.

कदम म्हणाले, स्मार्टफोनच्या वापराबाबत समाजात अजून हवी तशी जागृती नाही. कुठलाही मजकूर पुढे टाकताना तो खरा की खोटा, याची पडताळणी करावी. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कोठे आहात किंवा एकटे आहात याची माहिती समाजमाध्यमांवर देऊ नका. दृष्प्रवृत्ती याचा गैरफायदा घेऊ शकतात.

सोशल मीडिया ऍप्सचा काळजीपूर्वक वापर करावा. धार्मिक भावना दुखावतील किंवा जातीधर्मात तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह संदेश समाजमाध्यमांवर टाकू नका. पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मशीनचे निरीक्षण करा. कार्डच्या सॉकेटला कोणताही “स्कीमर’ बसवला नसल्याची खात्री करून मशीनचा वापर करा.

आजच्या घडीला दहा हजार वर्तमानपत्रे असून त्यांचे 20 ते 25 कोटी वाचक आहेत. 18 ते 34 वर्षे वयोगटातील तरुण सोशल मीडियाकडे जास्त वळला आहे. फेसबुक वापरणाऱ्यांमध्ये रोज सात लाखांची भर पडत आहे. समाजमाध्यमांची व्याप्ती मोठी आहे, त्याच्या वापराबाबत जनजागृती झाली पाहिजे. समाजमाध्यमांचे फायदे आणि तोटेही मोठे आहेत, असे युवराज पाटील म्हणाले.

सायबर गुन्ह्यांमुळे सायबर ऍक्‍ट अस्तित्वात आला आहे. समाजमाध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. हे प्रमाण कमी करायचे असल्यास समाजमाध्यमांच्या वापराबाबत व्यापक जनजागृती आवश्‍यक आहे, असे प्रास्ताविकात हजारे यांनी सांगितले. कार्यशाळेस पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकांनी ऑनलाईन फसवणार्‍या लोकांच्यापासून सावध राहावे तसेच काही तक्रार असल्यास सायबर पोलीस ठाणे सातारा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.