ऐन हंगामात जलतरण तलाव बंद

तलावायन भाग – 3

———–

प्रशांत होनमाने
पिंपरी – उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असतानाच कासारवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव मागील आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. या तलावात पाणी शुद्धीकरणासाठी बसवण्यात आलेल्या मोटार जुनाट झाल्या असून त्या वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे तलाव बंद ठेवण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली असून त्यामुळे परिसरातील जलतरणप्रेमींचा हिरमोड होत आहे. हा तलाव लवकरात-लवकर सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या जलतरण तलावाला सध्या समस्यांनी ग्रासले असून येथील पाणी अतिशय खराब झाल्याने ते हिरवे झाले आहे. तसेच येथील पाणी साठवण्यासाठी असलेल्या टाकीला लिकेज असल्याने हा जलतरण तलाव वारंवार बंद ठेवावा लागत आहे. त्यामुळे महापालिका व ठेकेदारांच्या गलथान कारभाराचा फटका येथील नागरिकांना व अबालवृद्धांना सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी पाण्यासाठी बोअरची सोय करण्यात आली होती. मात्र ती बोअर पालिकेने दुसऱ्याच कामासाठी जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकली आहे. त्यामुळे येथील पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याकडे पालिकने तातडीने उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

या ठिकाणी स्वच्छतेचा फार मोठा अभाव दिसून आला. येथे वॉशरुममधील शॉवरचीही मोडतोड केली गेली असून टॉयलेट व मुतारीमध्ये गुटखा व तंबाखू खावून लोक थुंकत आहेत. तसेच येथे येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. तसेच येथे पोहायला येणाऱ्या लोकांना साहित्य ठेवण्यासाठी असलेले लॉकर अतिशय कमी असून ते अपूरे पडत आहेत.

उन्हाळ्यामुळे पोहयाला येणाऱ्या लोकांची संख्या क्षमतेपेक्षा तिप्पट आहे. या जलतरण तलावाची क्षमता ही केवळ 100 ते 150 लोक पोहू शकतात एवढी आहे. मात्र सध्या येथे एका बॅचसाठी साधारणतः 300 ते 400 लोक येत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. मात्र जलतरणासाठी केवळ एकच सुरक्षा रक्षक आणि केवळ दोनच जीवरक्षक नेमले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षाही रामभरोसे आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत शहरातील 11 जलतरण तलावांच्या पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल, यांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी ठेकेदारांना दरमहा 9 कोटी 17 लाख रुपये दिले जात आहेत. मात्र एवढे पैसे देवूनही जलतरण तलावाचा प्रश्न जैसे-थे आहेत

त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामध्ये काही नगरसेवकांच्या जवळच्याच लोकांना ठेकेदार म्हणून नेमले गेले असून त्यांनी जलतरण तलावातील कोणत्याही प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढलेला नाही. असे असताना महापालिका ठेकेदाराला कशासाठी पोसत आहे, असा सवाल नागरीक करत आहेत.

टवाळखोरांचा ताप वाढला
काही स्थानिक टवाळखोर तलावामध्ये फुकट जलतरणासाठी सुरक्षा रक्षकाला दमदाटी करत असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. येथे आमची जमीन गेली आहे. त्यामुळे आम्ही फुकटच पोहणार अशा प्रकारची दमबाजी करतात. मद्यपान करुन याठिकाणी जलतरणासाठी येत असल्याने त्यांना रोखणे हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे येथे व्यवस्थापकाला वारंवार स्थानिक पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. यातील काही गुंडांनी या इमारतीच्या खिडक्‍यांवर दगडफेक केली करत काचा फोडल्याचा प्रकारही येथे घडला आहे. त्यामुळे येथील सुरक्षा रक्षक आणि अन्य कर्मचारी नेहमी भितीच्या सावटाखाली काम करत असतात. तसेच या जलतरण तलावाच्या सुरक्षा भिंतीला सुरक्षा जाळी नसल्याने काही टवाळखोर भिंतीवरुन उड्या मारुन आत प्रवेश करत असल्याच्या तक्रारी याठिकाणी येणाऱ्या जलतरण प्रेमींनी केल्या.

नागरिकांच्या मागण्या
– पाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत यंत्रणा बसवावी
– पिण्याच्या पाण्याची सोय करावी
– सुरक्षा रक्षक,जीवरक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी
– येथील सुरक्षा भिंतीवर तारेचे कुंपण घालावे
– स्थानिक गुंडावर कारवाई व्हावी
– कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावेत
– जीव रक्षक विभागासाठी रिंग व बांबूची सोय करावी
– आणखी 2 बॅचेस वाढवाव्यात
– महिलांसाठीही स्वतंत्र आणखी 1 बॅच वाढवावी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)