ऐन निवडणुकीच्या धामधुमीत निष्ठावंतांची चेष्टा

कार्यकर्त्यांना आले चांगले दिवस

लाखणगाव- लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बदललेल्या राजकीय विचारसरणीमुळे निष्ठावंत हा शब्दच आता कोणासाठी वापरायचा हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. कारण सत्ता, निवडणूक आणि पैसा या एकाच विचाराने सगळेच पक्ष निवडणुकीचा विचार करीत आहेत. त्यामुळे पक्षाची ध्येयधोरणे ही कुठेतरी बाजूला ठेवून निवडणूक जिंकण्याचा विचार पक्ष करीत आहेत. पूर्वी पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्या अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष उमेदवारी द्यायचा; परंतु सध्या जिंकून येण्याची शक्‍यता आणि आर्थिक स्थिती पडताळून दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवाराला प्राधान्य देवून आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांची ससेहोलपट होताना दिसत आहे.

निवडणूक प्रचारात आपल्या पक्षाची भक्‍कम बाजू मांडण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जाते. पूर्वी तन-मन-धनाने आणि हिरीरीने कार्यकर्ते आपल्या नेत्याचा व पक्षाचा प्रचार करायचे; परंतु आता नेतेच पक्षांतर करीत असल्यामुळे कार्यकर्त्यांसमारे कुठे जायचे हा प्रश्‍न पडला आहे. ज्या नेत्याकडून आपल्याला लाभ होणार आहे, ज्यामुळे आपल्याला नोकरी-व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. तसेच आपल्या अडी-अडचणीसाठी मदत होणार आहे. अशाच नेत्याच्या पाठीमागे कार्यकर्ते पळत असल्याचे पहावयास मिळत आहे. पूर्वी विचारासाठी पक्षात काम करीत असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीच आता नामशेष झाली आहे.

पक्ष, त्या पक्षाचा विचार यापेक्षा माझा फायद्याचा कोणता नेता, त्यामागेच पळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नेत्यांसारखेच कार्यकर्तेही आता मतलबी झाल्याचे पहावयास मिळत आहे. पूर्वी कार्यकर्ता हा सतत पाच वर्ष पक्षाचे काम करायचा; परंतु सध्या निवडणुकीपुरताच पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही त्याच पद्धतीचा विचार करुन काम करीत आहेत. सध्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मनधरणी करुन प्रचाराला लावण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. लग्नसमारंभ, दशक्रिया विधी, पूजा, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून नेते आपल्या कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विविध कार्यक्रमांना नेत्यांची वर्दळ वाढली असून अनेक कार्यकर्ते छोट्या-मोठ्या लग्नसमारंभामध्ये जाऊन भेटी देऊ लागले आहेत.

  • कार्यकर्त्यांची मनधरणी
    सध्या निवडणुकीचे ऊन तापू लागले आहे. त्याचप्रमाणे प्रचार ही तापू लागला असून येणाऱ्या दिवसांत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण गरम होणार आहे. सध्या मात्र सर्वत्र नेतेमंडळी कार्यकर्त्यांची मनधरणी करताना आणि या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचे काम करावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून नेतेमंडळी या कार्यकर्त्यांची विशेष दखल घेताना पहावयास मिळणार आहे. त्यामुळे सध्या पक्षापासून दूर असलेला आणि अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांलाही चांगले दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.