ऐन उन्हाळ्यातही टोमॅटोचे भरघोस पीक

पेठ-पेठ (ता. आंबेगाव) येथील शेतकरी विकास बुट्टे यांनी ऐन दुष्काळी व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विहिरीचे पाणी राखून ठेवून आधुनिक शेती करत टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. एकूण 25 गुंठे जमिनीत टोमॅटोचे 15 तोडे झाले असून 325 क्रेट विक्रीसाठी पाठविले आहेत.

सातगाव पठार म्हटले की, जानेवारी ते मे-जूनपर्यंत नजर जाईल तिकडे नांगरलेली शेती नजरेस पडते. याला अपवाद पेठ येथील बुट्टेवस्ती आहे. येथील शेतकरी विकास बुट्टे यांनी आधुनिक शेतीची कास धरत मल्चिंग पेपर व कमी पाण्यात ठिबक सिंचनद्वारे टोमॅटोचे विक्रमी पीक घेतले आहे. आतापर्यंत 20 ते 22 तोडे टोमॅटोचे झाले असून, प्रतिकिलो 16 ते 18 रूपये भाव मिळत आहे. याबाबत शेतकरी विकास बुट्टे यांनी माहिती देताना सांगितले की, चांगला निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या जमिनीत हे पीक चांगले येते. टोमॅटोची लागवड कारण्यापूर्वी वाफ्यांना आडवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवली. त्यात रोपांची लागवड केली जाते. खत व्यवस्थापन करताना रोप व किडनियंत्रण करण्यासाठी शक्‍यतो सायंकाळी फवारणी केली जावी. सेंद्रिय खते, शेणखत व निंबोळी आदी खते दिल्यामुळे टोमॅटो रोपांची चांगली वाढ होते.
पाण्याचे नियोजन- लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी दिले. उन्हाची तीव्रता जादा असल्याने दिवसाआड रोपांना पाणी द्यावे. पीक फुलांवर येताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टोमॅटो लागवडी नंतर 30 ते 35 दिवसांनी झाडांची वाढ जोरात झाल्यानंतर फांद्या व फुटी मोठ्या प्रमाणावर होतात. त्याकरिता बांबू व सुतळी, तार यांनी आधार द्यावा लागतो.

टोमॅटो फळांची तोडणी करताना निम्मी लाल व निम्मी हिरवी असताना तोडणी करावी लागते. शेतात काम करताना व टोमॅटो तोडणी करणे. निवडून क्रेटमध्ये भरणे आदी कामे विकास बुट्टे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी सुजाता या शेतात करतात. मुलगा गौरव, प्रणव व ज्ञानेश्वरी यांची या कामी मोठी मदत होत आहे. त्यामुळे विकास बुट्टे यांनी आपल्या शेतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वैराण माळरानावर टोमॅटो शेती फुलवली आहे. शेतीची मशागत, लागवड, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, शेड नेट उभारून पिकाला गारवा निर्माण करणे हे सर्व कसब भर उन्हाळ्यात विकास बुट्टे यांनी साधून टोमॅटोचे विक्रमी पीक घेतले आहे.

  • आहारात महत्त्वाचे
    आहारात टोमॅटोचे महत्त्व फार आहे. केचप, सूप, सॉस, चटणी इत्यादी पदार्थ बनतात. टोमॅटोमध्ये पाण्याची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. तसेच फायबरचे प्रमाण आरोग्यासाठी हितकारक असते. रोज टोमॅटो सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. टोमॅटो सॅलड म्हणूनही आरोग्यदायी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.