ऐतिहासिक वाई तालुक्‍याला अंधश्रद्धेचे ग्रहण

मांढरदेवसह सुरुर परिसरात बुवाबाजीला ऊत, पशुहत्येच्या प्रमाणात पुन्हा वाढ
वाई, दि. 31 (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाई तालुक्‍यात सध्या बुवाबाजीला चांगलाच ऊत आला आहे. तालुक्‍यातील मांढरदेव परिसर, पसरणी घाट, सुरुर येथील दावजी पाटील यासारख्या अन्य काही ठिकाणी पशुहत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखेच प्रकार याठिकाणी पुन्हा सुरु झाले आहेत. एकंदरीत तालुक्‍यात वाढत असलेल्या बुवाबाजीच्या प्रकारामुळे वाई तालुक्‍याला अंधश्रद्धेचा जणु विळखाच पडू लागला आहे.
वाई तालुक्‍यातील मांढरदेव, वाई- सुरूर रस्त्यावरील धनगर बुवा, पसरणी घाटातील बुवासाहेब, सुरुरचा धावजी पाटील या ठिकाणी पौर्णिमा-अमावस्येच्या दिवशी देवाच्या नावाखाली शेकडो पशु-पक्षांचे जीव घेतले जातात. या सर्व प्रकारांनी अंधश्रद्धेची झालर पांघरली आहे. सध्या आकाडी चालू असल्याने शेवटच्या पंधरा दिवसात पसरणी घाटातील बुवासाहेब व धनगर बुवा या ठिकाणी कोंबड्यांची कत्तल मोठ्या प्रमाणात केली जाते. या ठिकाणी असणारे भोंदूबाबा भाविकांना त्यांच्या असाह्यतेचा फायदा घेवून नको ते प्रकार करण्यास भाग पाडतात. या बुवाबाजीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असते ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे तालुक्‍यातून बुवाबाजीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठोस कृतीची गरज आहे.
मांढरदेव येथे काही वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेत शेकडो भक्तांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी मांढरदेवी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पशुहत्या देवीच्या रक्षकांच्या नावावर केली जात असे, त्यावेळी मांढरदेवीला पशुहत्या करून नैवद्य दाखविण्याची प्रथा होती. तसेच देवी अंगात येण्याच्या प्रकारांनी कळस गाठला होता. त्याठिकाणी अंगात येणे व पशुहत्या करणे यावर मंदिर प्रशासनाने कायमच बंदी घातली. परंतु, आजही या ठिकाणची बुवाबाजी बंद झालेली नाही. मांढरदेवकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच वाई एमआयडीसी मध्ये मुख्य रस्त्यावर काळूबाई मंदिरात हा प्रकार चालत असूनसुध्दा प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दुर्दैवाने पहावयास मिळत आहे. मांढरदेव मंदिराच्या परिसरात प्रशासनाने कितीही बंदी घातली तरीही झाडाला खिळे ठोकणे, करणी करणे, अंगात येणे हे प्रकार संपूर्ण वर्षभर चालू असतात. गेल्या दोन वर्षात नरबळी सारख्या घटनांनी तालुका बदनाम झाला आहे.
वाई तालुक्‍यातील मांढरदेवी, धावजी-पाटील व धनगर बुवा मंदिर या ठिकाणी दर अमावस्या, पौर्णिमेला बुवाबाजीचे अवैध धंदे चालतात. संपूर्ण राज्यातील भक्त या ठिकाणी स्वतःवर आलेले बालंट दूर करण्यासाठी अथवा दुसऱ्यांचे बरेवाईट व्हावे यासाठी करणी करण्यासाठी येत असतो.
शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वाई तालुक्‍याची प्रतिमा बुवाबाजीचे ग्रहणात अडकली आहे. अंधश्रद्धेच्या प्रकारांमुळे संपूर्ण तालुक्‍याची प्रतिमा मलीन होत असून ही बुवाबाजी मुळासकट उपटून टाकायची झाल्यास पोलिसांबरोबर समाजातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे आज काळाची गरज आहे. तसेच बुवाबाजीच्या विरोधात एक दिशा ठरवून ठोस कृतीची नितांत गरज आहे. तरच वाई तालुक्‍यातील चालणारे बुवाबाजीचे प्रकार बंद होण्यास काही अंशी मदत होईल. अंनिसचे या ठिकाणी करीत असलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
अंद्धश्रद्धेसाठी समाजाच्या पुढाकाराची गरज
धावजी-पाटील मंदिरातील भोंदूबाबांवर एलसीबी ने धडक कारवाई करून पाच देवऋषींना अटक करून भोंदू गिरीवर हातोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या कारवाईनंतरही याठिकाणी अनिष्ट प्रथा सुरुच आहेत. शासनाने अंधश्रद्धेविरुध्द कायदे तर कडक केले, परंतु त्याची अंमलबजावणी कडक झाली नाही. त्याचाच फायदा घेत बुवाबाजीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. फक्त बुवाबाजीवर अनिसनेच कारवाई करण्याची अपेक्षा न ठेवता समाजानेही पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)