एसटी वाहतुकीला फटका

वल्लभनगर आगार : आंदोलनामुळे अनेक फेऱ्या रद्द केल्याने उभ्या असलेल्या बस.

मराठा आंदोलन : वल्लभनगर आगार “ठप्प’

पिंपरी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकण, राजगुरुनगरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दोन दिवसापासून पिंपरी शहरातील वल्लभनगर आगारातून बाहेर जाणाऱ्या एस.टी च्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे, दोन दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे पाच लाख 67 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी वल्लभनगर आगारात अनेक बस उभ्या असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खेड, राजगुरुनगर, चाकण या भागात आंदोलकांनी सोमवारी एस.टी, पोलिस वाहने, खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने पोलिसांनी नाशिक-पुणे रस्ता बंद केलेला होता. यामुळे, अनेक वाहने रस्त्यात अडकून पडलेली होती. आंदोलकांनी बहुतांश ठिकाणी एस.टी बसला लक्ष केल्याने या मार्गावर असणाऱ्या अनेक स्थानकात बस थांबवून ठेवण्यात आलेल्या होत्या. चाकण येथे अंदोलकांनी तीन एस.टी बस पेटवून दिल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. तसेच, पोलिसांनी या भागात जमावबंदीचे आदेश दिले होते. आंदोलनामुळे खबरदारी म्हणून गेल्या दोन दिवसापासून वल्लभनगर बस स्थानकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

नाशिक-पुणे महामार्ग सुरु केल्याने वाहतूक सुरळीत झालेली आहे. तसेच, मंगळवारी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून शहरात महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती भोसरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली.

वल्लभनगर बसस्थानकातून रविवारी सोडण्यात आलेल्या ओतुर, जुन्नर, आसाने या भागातील बस अजूनही वल्लभनगर स्थानकात परतलेल्या नाहीत. तसेच, पंढरपूर आगाराच्या चार तर नाशिक आगाराच्या तीन बस वल्लभनगर स्थानकात अडकून पडलेल्या आहेत. तसेच, राज्यभरातून बस येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आंदोलनाची धग बहुतांशी प्रमाणात एस.टीला बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
                       – जनार्दन लोंढे, वल्लभनगर बस स्थानक प्रमुख.

राज्य सरकारने कृती करावी…
राज्यभरात मराठा आंदोलन दिवसे-दिवस हिंसक होत आहे. आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विधीमंडळात असलेल्या 145 मराठा आमदारांनी अधिवेशनात राजीनामे दिले पाहिजेत. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या संवेदना व समाजाची हाक ओळखून लवकरात-लवकर कृती करा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे प्रवर्तक आप्पा शिंदे यांनी केले आहे.

आंदोलनामुळे अनेक मार्गावरील एस.टी बस बंद असल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले आहेत. याचा गैरफायदा खासगी वाहनचालकांनी उठवून प्रवाशांची आर्थिक लूट सुरु केली आहे. खासगी वाहनचालक प्रवाशांकडून दुप्पट आकाराने पैसे घेत आहेत. नाशिक फाटा ते आळा फाटा दरम्यान बसला 120 तिकीट असूनही मंगळवारी तीनशे ते साडे-तीनशे रुपये वाहनचालक घेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)