एसएससी बोर्डात कडेकोट बंदोबस्त

जाळून घेण्याच्या प्रकारानंतर सुरक्षा वाढवली

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे येथील विभागीय मंडळात महिलेने जाळून घेण्याचा प्रकार झाल्यानंतर अखेर बोर्डाला जाग आली असून येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्‍तीकडील सामानाची चौकशी करून मगच त्यांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वी एसएससी बोर्डात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या प्रेमसंबंधातून एका महिलेने बोर्डातील शौचालयात पेट्रोल ओतून जाळून घेतले होते. त्यामुळे एकूणच शिक्षण विभाग हादरला होता. अशा प्रकारे बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ही आग पसरली असती तर बोर्डातील एकूणच दस्ताऐवजांच्या सुरक्षेचा तसेच तेथील उपस्थित व्यक्‍तींना मोठी हानी पोहोचली असती. याबाबत पोलिसांनीही बोर्डाची कानउघडणी केली असून एखादी व्यक्‍ती पेट्रोल आतमध्ये घेऊन येते व आपल्याला कळतही नाही, याबाबतही विचारणा केली होती. त्यामुळेच बोर्डाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बोर्डात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीचे नाव, वेळ, सही घेण्याबरोबरच त्यांचे काय व कोणाकडे काम आहे, याचीही विचारणा केली जाते. तसेच संबंधित व्यक्‍तीकडे नेमके काय सामान आहे. याचीही तपासणी सुरक्षा रक्षकांकडून होत आहे.
– तुकाराम सुपे, अध्यक्ष, पुणे विभागीय शिक्षण मंडळ (एसएससी बोर्ड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)