एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धा सोमवारपासून

यंदा प्रथमच महिलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

पुणे: तळागाळात हॉकी रुजावी यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एसई सोसायटीच्या एसएनबीपी ग्रुप तर्फे दरवर्षी अखिल भारतीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे सलग तिसरे वर्ष असून 16 वर्षांखालील मुलांची हॉकी स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे 1 ते 7 ऑक्‍टोबर दरम्यान खेळवली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात आणि महाराष्ट्रात 16 वर्षांखालील मुलांसाठी आयोजित करण्यात येणारी ही एकमेव अखिल भारतीय स्पर्धा आहे. यावेळी पहिल्यांदाच महिलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आठ जिल्ह्यांमधून महिलांचे आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत बाद फेरी पद्धतीने सामने खेळवले जाणार आहेत.

मुलांच्या मुख्य स्पर्धेत देशभरातून 24 संघ सहभागी होणार असून ते साखळी आणि बाद फेरी पद्धतीने खेळवले जाणार आहेत. हे संघ आठ गटांत विभागले जातील. प्रत्येक गटाचा विजेता संघ थेट उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. साखळी फेरीत प्रत्येक संघ दोन सामने खेळेल आणि त्या गुणांवर गटाचा विजेता ठरेल. उपान्त्यपूर्व फेरीनंतर 6 ऑक्‍टोबर रोजी उपान्त्य फेरीचे सामने खेळवले जातील. अंतिम सामना आणि तिसऱ्या क्रमांकाचा सामना 7 ऑक्‍टोबर रोजी होईल.

संयोजन प्रमुख आणि एसएनबीपीच ग्रुपच्या अध्यक्ष डॉ. वृषाली भोसले यावेळी म्हणाल्या की, या वर्षी महिलांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आम्हाला आनंद होत आहे. हॉकी रुजवण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये महिलांची स्पर्धा असावी असा आमचा पूर्वीपासूनच प्रयत्न होता आणि त्या दृष्टीने आम्ही नियोजन करत होतो. पुण्यात आणि महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी संधी मिळावी हा आमचा प्रयत्न होता. याच खेरीज आता आम्ही महिला खेळाडूंनाही मैदान उपलब्ध करून दिले आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा ही कल्पना प्रथम मांडण्यात आली तेव्हा आमची दोन प्रमुख उद्दिष्टे होती, पहिले म्हणजे राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी निर्माण करून देणे आणि या गुणवान खेळाडूंना एकत्र आणून त्यांच्या गुणांना वाव देणे. आणि आता 2018 मध्ये आम्ही महिला सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत असून ही राज्यस्तरीय स्पर्धा त्याचेच द्योतक आहे.

मुलांच्या स्पर्धेमध्ये 12 राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत ज्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, नवी दिल्ली, हरयाणा, चंदीगड, पंजाब (सर्व उत्तर विभाग), कर्नाटक (दक्षिण विभाग), पश्‍चिम बंगाल (पुर्व विभाग) आणि यजमान महाराष्ट्राखेरीज राजस्थान, आणि गुजरात (पश्‍चिम विभाग) यांचा समावेश असेल. गेल्या वर्षीचा विजेता संघ मध्य प्रदेश अकादमी आणि उपविजेते शहीद बिशन सिंग प्रशाला, दिल्ली यांनीही आपला सहभाग निश्‍चित केला असून गेल्या वर्षी उपान्त्य फेरी गाठणारा पुण्याचा क्रीडा प्रबोधिनीचा संघ आणि हॉकी कूर्ग हेही सहभागी होणार असून स्पर्धेतील चुरस चांगलीच वाढली आहे.

यजमान एसएनबीपी दोन संघ उतरवणार असून ते एसएनबीपी अकादमी आणि एसएनबीपी प्रशाला अशा नावाने स्पर्धेत खेळतील. संयोजन सचिव विभाकर तेलोरे यांनी यावेळी माहीती देताना सांगितले की, गेल्या वर्षीप्रमाणेच देशाच्या चारही विभागातून संघ आल्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने अखिल भारतीय झालेली आहे. महाराष्ट्रातही पुण्याखेरीज धुळे, नाशिक, चंद्रपुर आणि मुंबई जिल्ह्यातून संघ आल्यामुळे सर्व स्तरांचे प्रतिनिधित्व ही स्पर्धा करत आहे.

स्पर्धेचे कन्व्हेनर फिरोज शेख म्हणाले की, अकादमी आणि शाळेचे संघ सहभागी होत असल्याने सर्व सामने अतिशय चुरशीने खेळले जातील. एकूण 34 सामन्यात 480 खेळाडू आपला कस लावतील तर हॉकी इंडियाचे 24 तांत्रिक अधिकारी स्पर्धा व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रयत्नशील राहतील. हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी इंडियातर्फे आम्ही एसएनबीपी ग्रुपला त्यांच्या या प्रयत्नांसाठी धन्यवाद देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)