वानवडी येथील 30 उत्तरपत्रिका मूळ गठ्ठ्यात मिसळल्याची माहिती
नांदेड येथील प्रकरणानंतर तपास सुरू
पुणे – नांदेड येथील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता असाच प्रकार पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात होत आहे. नांदेड, औरंगाबाद, जालना आणि त्यापाठोपाठ पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतील काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिका लिहून त्या मुख्य गठ्ठयात मिसळण्यात आल्याचा संशय आहे.
याप्रकरणात एस. एस. जी. सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाचे (एसआरपीएफ) दोन कर्मचारी आणि एका मध्यस्थाच्या मदतीने 30 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्याची माहिती याप्रकरणात अटक आरोपीने नांदेड पोलिसांना दिली आहे. नांदेडमधील 69 पोलीस शिपायांच्या जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. प्रवीण भटकर हा ओएमआर कंपनीचा संचालक आहे. त्याने काही पोलिसांना हाताशी धरुन उमेदवारांना लेखी परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवायला सांगितल्या होत्या. त्यानंतर कोऱ्या उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहून त्या मुख्य उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यात मिसळल्या होत्या. या उमेदवारांना 90 टक्के गुण मिळाले होते. नांदेड पोलिसांना संशय आल्याने याप्रकरणाची चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडे करण्यात आलेल्या चौकशी प्रवीण भटकरने एस. एस. जी. सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचाऱ्यांची मदत घेतली. त्यांच्याशी संगनमत करुन पुण्यातील वानवडी भागात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनमधील 30 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका मुख्य उत्तरपत्रिकांच्या गठ्ठयात मिसळण्यात आल्याचे माहिती चौकशीत उघड झाली आहे. औरंगाबाद, जालना येथील राज्य राखीव दलाच्या परीक्षा केंद्रावर असे गैरप्रकार झाले असल्याची शक्यता आहे. नांदेड पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेखला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नांदेडमध्ये गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाल्याने चौकशी सुरु करण्यात आली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा