एमपीएससीकडून परीक्षा घ्यावात

एमपीएससीकडून परीक्षा घ्यावात : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

पुणे – शासकीय सेवेतील महत्त्वाच्या पदासाठी घेतली जाणारी परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे न घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्यासह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, स्पर्धा परीक्षा खासगी कंपनीच्या पोर्टलवरून घ्यायच्या असतील तर राज्याचा मुख्यमंत्रीही खासगीच ठेवावा, अशी टीका बच्चू कडू यांनी यावेळी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापरीक्षा महापोर्टल हे स्पर्धा परीक्षांचे ढिसाळ नियोजन करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी खेळत आहे. गेल्या काही महिन्यात अन्न व पुरवथा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी आदी पदांच्या परीक्षा महापोर्टलद्वारे घेण्यात आल्या. मात्र,या परीक्षा पारदर्शक पध्दतीने घेतल्या गेल्या नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

महापरीक्षा पोर्टलवरून परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे महापोर्टल बंद करून सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घ्याव्यात. तसेच संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे पीएसआय, एसटीआय, एएसओच्या परीक्षा घेण्यात याव्या. या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आले. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता नसल्याने विद्यार्थी अभ्यास करण्याचे सोडून निराश होऊन पुन्हा घरी जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे आवाज उठवावा लागत आहे. परंतु,आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या प्रश्नांसाठी सुध्दा आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे सांगत बच्चू कडू म्हणाले, खासगी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी शासन महापोर्टलद्वारे स्पर्धा परीक्षा घेत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग अस्तित्वात असताना स्पर्धा परीक्षा खासगी कंपनीकडून घेणे चुकीचे आहे. परीक्षा कंपनीकडे दिल्या जात असतील तर राज्याचा कारभारही दोन मुख्यमंत्र्यांकडे द्यावा. एक शासकीय व एक खासगी मुख्यमंत्री ठेवावा, अशी टीकाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)