पुणे – एमडी, एमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पहिली सुधारित गुणवत्ता यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यातील विद्यार्थ्यांना मात्र दि. 27 ते 29 एप्रिल या कालावधीत प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली. दरम्यान, शनिवारपासून बॅंकांना सलग चार दिवस सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे शुल्क कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पहिली यादी जाहीर केली. व्यवस्थापन कोट्याच्या पाचपट शुल्कवाढीसाठी राज्यातील सात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यापूर्वी प्रकाशित केलेल्या पहिल्या प्रवेशाच्या यादीतील विद्यार्थ्यांना एमडी, एमएस पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सामान्य कोट्यातील दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. मात्र, आता कॉलेजांनी व्यवस्थापन कोट्यासाठी चारपट शुल्क आकारण्याला सहमती दर्शविल्याने पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार सीईटी सेलने प्रवेशाची सुधारित यादी गुरुवारी दुपारी प्रकाशित केली. यामध्ये प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसोबतच सर्वांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या नव्या प्रवेश प्रक्रियेनुसार विद्यार्थ्यांना 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसांत प्रवेश घ्यायचे आहेत. खासगी महाविद्यालयांचे शुल्क हे प्रतिवर्ष 10 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्काची रक्कम जमविण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. अशातच 28 एप्रिल ते 1 मेपर्यंत म्हणजेच सलग दिवस बॅंकांना सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी मिळणार आहे. या एका दिवसात डीडी काढणे, रोख रक्कम किंवा शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया करणे अशक्य आहे. त्यामुळे प्रवेशाचा कालावधी 5 मेपर्यंत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा