एफटीआयआयच्या सदस्यपदी अनुप जलोटा

पर्सन ऑफ इमिनन्स (महत्त्वपूर्ण) या प्रकारात झाली निवड

पुणे : “बिग बॉस’च्या घरात आपल्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असलेले गीतकार अनुप जलोटा यांची भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेच्या(एफटीआयआय) सोसायटी सदस्यपदी नेमणूक झाली आहे. जलोटा यांची “महत्त्वपूर्ण’ व्यक्ती म्हणजेच पर्सन ऑफ इमिनन्स या प्रकारात ही निवड झाली आहे. एकूणच विविध वादग्रस्त व्यक्तींच्या नेमणुकीमुळे आधीच विवादात सापडणाऱ्या चित्रपट संस्थेबाबत या नेमणुकीतून पुन्हा नवीन वाद उदभवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रपट प्रशिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था असलेल्या एफटीआयआय संस्थेच्या सोसायटी सदस्यांचा कार्यकाळ संपत आल्याने माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे नवीन सदस्यांची नेमणूक केली आहे. यामध्ये जलोटा यांचीही निवड करण्यात आली आहे. मूळचे नैनिताल येथील असलेले जलोटा यांनी आपल्या भजन आणि ऊर्दू कविता आणि गझल यांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या गीतांच्या लोकप्रियतेमुळेच जलोटा यांना “भजन सम्राट’ अशी ओळख दिली आहे. मात्र, जलोटा यांचे विवाह आणि आपल्यापेक्षा वयाने तब्बल 39 वर्षे लहान असणाऱ्या जसलीन माथूर या मुलीसोबत असणाऱ्या संबंधांमुळे जलोटा हे चांगलेच चर्चेत आले आहेत. तर, चित्रपट संस्थेत चित्रपट क्षेत्राबाबत अतिशय कमी पात्रतेच्या व्यक्तींची नेमणूक केली जात असल्याच्या आरोपावरून गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध नोंदविला होता. जलोटा यांच्या निवडीबाबतही विद्यार्थी अशाच प्रतिक्रिया नोंदवतील का हे आगामी काळात स्पष्ट होईल.

वैयक्तिक आयुष्यातील वादांबाबत चर्चा नको
याबाबत सोसायटीचे सदस्य अभिनेता राहूल सोलापूरकर म्हणाले, “सोसायटीचे कार्य हे संस्थेचे आर्थिक आणि कार्यात्मक धोरण ठरविणे हे असते. या सोसायटीचे सदस्य विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देत नाहीत. त्यामुळे या सदस्यांचा विद्यार्थ्यांसोबत थेट संबंध नसतो. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विशेषत: सिनेक्षेत्रातील व्यक्तीच्या आयुष्यात कोणते न कोणते वाद असतातच. याचा अर्थ ती व्यक्ती पात्र नाही असा होत नाही. त्यामुळे जलोटा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांबाबत चर्चा न करता, त्यांच्या कामाबाबत बोलणे अधिक सोयीस्कर ठरेल.’

यांचीही झाली निवड
मंत्रालयातर्फे येसूदास, कंगना रणावत, अरविंद स्वामी, ब्रिजेंद्र पाल सिंग, दिव्या दत्ता, सतिश कौशिक आणि डॉ. अर्चना राकेश सिंग यांचीही निवड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त माजी विद्यार्थी प्रकारात राजकुमार हिरानी, विधु विनोद चोप्रा, डॅनी डींग्पोझा आणि महेश अणेय यांची तसेच तज्ज्ञ सदस्यपदी मानवसंसाधन मंत्रालयाच्या उच्चशिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. एन. सर्वना, परदेशी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव रविश कुमार आणि डिरेक्‍टोरेट ऑफ फिल्म फेस्टीव्हलचे चैतन्यप्रसाद यांची निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)