“एनआरआय’ना पाठविणार ऑनलाईन वॉरंट

सुषमा स्वराज : विवाहांमध्ये येणा-या समस्या तातडीने सुटणार
नवी दिल्ली – अनिवासी भारतीयांसोबतच्या (एनआरआय) विवाहांमध्ये येणा-या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे “अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी- समस्या आणि उपाययोजना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“एनआरआय विवाह’ हा विषय आता राज्याचा विषय राहीला नसून देशभरातील सर्व राज्यांमध्ये पिडीत महिलांच्या संख्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. याप्रकरणांमध्ये कुटूंबातील व्यक्तींची सहभागिता मोठ्या प्रमाणात दिसून येते. नवविवाहीत युवतींना संरक्षण मिळावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही ठोस पाऊले उचलली आहेत.

मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून थेट वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा प्रयत्न सुरू असून या लोकसभा सत्रात अथवा पुढच्या सत्रात या विधेयकास मंजूरी मिळेल. यामुळे दोषी व्यक्ती जगात कुठेही असल्यास त्याला तातडीने पकडता येईल. यासह अनिवासी भारतीयांसोबत विवाह झाल्यास नवविवाहीत मुलीच्या नावे संपत्तीत वाटा असावा याबाबतही कायदे बनविण्यासंदर्भात संशोधन सुरू असल्याचे स्वराज यांनी सांगितले.

सध्या अनिवासी भारतीयांसोबतच्या विवाहामध्ये तातडीने करावयाच्या बदलांमध्ये दोषी असलेल्या व्यक्तीची तक्रार केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाला केल्यास, संबंधित व्यक्तींचे पासपोर्ट रद्द करण्यात येते. यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय एनआरआय व्यक्तीसोबत विवाह करताना संपूर्ण चौकशी करूनच लग्नाचे पाऊल उचलण्याच्या सूचनाही स्वराज यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)