एक लाख विद्यार्थी देणार टंकलेखन परीक्षा

परीक्षा 4 ते 8 फेब्रुवारीला :160 केंद्राची व्यवस्था सज्ज

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान 160 केंद्रावर टंकलेखन व लघुलेखन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला राज्यातील 1 लाख 170 विद्यार्थी बसणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता टंकलेखनसाठी 87 हजार 524 तर, लघुलेखनसाठी 12 हजार 646 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 9 हजार 70 विद्यार्थी टंकलेखयची परीक्षा देणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वां कमी 15 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. पुणे विभागात पुणे जिल्ह्यातील 860, अहमदनगरमधील 398, सोलापूरमधील 2 हजार 604 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यातील इतर विभागांचा विचार करता औरंगाबाद विभागात सर्वाधिक 27 हजार 366 तर, पुणे विभागात सर्वात कमी 3 हजार 862 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मुंबई विभागातील 5 हजार 556, नाशिकमधील 8 हजार 93, कोल्हापूरमधील 6 हजार 832, अमरावतीतील 17 हजार 550, नागपूरमधील 8 हजार 552, लातूरमधील 9 हजार 713 याप्रमाणे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

महाराष्ट्र व गोवा या राज्यांत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दररोज चार बॅचेसमध्ये या परीक्षा घेतली जाईल. परीक्षेची प्रवेशपत्रेही परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. टंकलेखन व लघुलेखन संस्थाचालकांना त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करून शिक्‍का व स्वाक्षरीसह विद्यार्थ्यांना वितरित करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याचे छायाचित्र नसल्यास किंवा चुकीचे छायाचित्र असल्यास संस्थाचालकांनी परीक्षा परिषदेकडून त्याची दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी संस्थाचालकांना दिल्या आहेत.

एप्रिल 2016 पासून संगणक टायपिंग परीक्षांना सुरुवात झाली आहे. आता बहुसंख्य शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये संगणक टायपिंगद्वारे कामे केली जातात. मॅन्युअल टायपिंगचा वापर दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. मात्र, ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या कमी होताना आढळत नाही. राज्य शासनानेही मॅन्युअल टायपिंग परीक्षा बंद करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. मात्र, संस्थाचालकांकडून याला तीव्र विरोध दर्शविण्यात आला होता. त्यामुळे शासनाकडून या परीक्षांसाठी सतत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संस्थाचालकांमध्येही एक गट मॅन्युअल टायपिंग परीक्षा बंद करण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरा गट तीव्र विरोधात असल्याची माहितीही मिळाली आहे. यावरून संस्थाचालकांना आपआपल्या संस्था सुरू राहाव्यात यातच रस असल्याचेही उघड होऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा परीक्षा देऊनही परीक्षेत उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढल्याचे आढळून येते.

शासनाकडून मॅन्युअल टायपिंग परीक्षा कायमस्वरूपी बंद होणार की त्यांना सतत मुदतवाढ मिळत राहणार? असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)