एक भीषण आरोग्य संकट (भाग- १)

भारतासह अन्य काही देशांत सध्या “निपाह’ नावाच्या एका नव्या विषाणूने नवे आव्हान उभे केले आहे. या विषाणूजन्य आजाराची लागण झालेल्यांपैकी 75 टक्‍के रुग्ण मृत्युमुखी पडतात, यावरुन याची भीषणता लक्षात येते. गेल्या दहा-पंधरा वर्षांत एव्हियन फ्लू, सार्स, स्वाईन फ्लू, झिका, एमआरएसए, इबोला अशा कधीही न ऐकलेल्या नावांच्या आणि डॉक्‍टरांनाही तोपर्यंत माहिती नसलेल्या असंख्य भयानक आजारांच्या साथी येऊन गेल्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते अशा साथी भविष्यातही येत राहतील. म्हणूनच सामान्यांना या आजारांची योग्य माहिती देऊन प्रतिबंधक उपायांचे ज्ञान देणे आजमितीला अत्यावश्‍यक झाले आहे.

मानवी आरोग्यापुढे एक नवे संकट उभे ठाकले आहे. ‘निपाह’ या नावाचा नवा विषाणूने जगात थैमान घालायला सुरुवात केली आहे. भारतात या विषाणूच्या रुपाने एक नवी भीषण समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याने केरळच्या कोझिकोडेमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, या 11 आणि आणखी 25 जणांच्या रक्ताची पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये तपासणी केल्यानंतर ‘निपाह’ व्हायरस असल्याची घोषणा केली गेली. जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे “हाय अलर्ट’ घोषित केला आहे. देशभरातील सर्व आरोग्यसंस्थांना या आजाराची विशेष काळजी घेण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

पूर्व इतिहास
1999मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये हा विषाणू सर्वात प्रथम आढळला. त्यावर्षी या टापूतील डुकरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मेंदूज्वर आणि श्वसनसंस्थेचा आजार अचानक दिसून आला. या आजाराची जेव्हा साथ पसरली तेव्हा त्या रुग्णांच्या रक्त चाचणीत हा विषाणू सापडला. सूनगाई निपाह या मलेशियातील खेड्यात या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले, त्यावरूनच या विषाणूचे नामकरण ‘निपाह’ असे करण्यात आले. हा विषाणू माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये एक गंभीर जंतूसंसर्ग पसरवतो असे लक्षात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलेशियातील या रोगाच्या साथीमध्ये 300 रुग्णांना याची बाधा झाली होती आणि त्यातील 100 जण दगावले. ही साथ रोखण्यासाठी मलेशियात 10 लाखापेक्षा जास्त डुकरांना इंजेक्‍शन्स देऊन मारण्यात आले. डुकराचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात करणाऱ्या मलेशियाच्या दृष्टीने हा मोठाच आघात होता, पण त्यानंतर गेल्या 20 वर्षांत मलेशिया आणि सिंगापूरमध्ये ‘निपाह’ विषाणूने बाधित एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यानंतर 2001मध्ये बांगलादेशातील मेहेरपूर जिल्ह्यात या विषाणूजन्य साथीच्या आजाराचा उद्रेक झाला होता. मात्र या निपाह विषाणूची जनुकीय रचना मलेशियातील विषाणूपेक्षा काहीशी वेगळी होती.

मलेशियात जरी 1999च्या साथीनंतर आजपावेतो निपाहने डोके वर काढले नसले, तरी बांगलादेशांत दरवर्षी या आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव दिसून येतो. 2001 मध्येच सिलीगुडी या भारतातील प. बंगालमधील गावी 71 जणांना याची लागण झाली होती आणि त्यातील 50 रुग्ण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर 2007 मध्ये प.बंगालमधील नादिया जिल्ह्यातील 30 व्यक्ती या विषाणूजन्य साथीच्या तडाख्यात सापडल्या होत्या, त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे केरळात आलेली ही भारताच्या दृष्टीने तिसरी साथ आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)