‘एक देश, एक धर्मा’ची नीती प्रलयंकारी

शरद पवार : सर्वसामान्यांच्या मुद्यावर केंद्र सरकार सपशेल अपयशी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार “एक देश, एक धर्म’ ही नीती लागू करू पाहत आहे. मात्र, विविध परंपरा आणि संस्कृतीच्या देशात ही बाब रेटून लावणे विध्वंसक प्रवृत्तीचे लक्षण असल्याची टीका शरद पवार यांनी आज केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन कलुबामध्ये आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सातव्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार निशाना साधला. शेतकरी, कृषी, रोजगार, पीक विमा अशा सामान्य माणसांशी संबधित मुद्यावर केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय रेटून मोदींनी सामान्य माणसाला देशोधडीला लावले आहे.

पवार म्हणाले, देश धार्मिक राजकारणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यांच्या नजरेत सांप्रदायिकता आणि विकास यात काहीही अंतर नाही. स्पष्ट सांगायचे म्हणजे, केंद्रातील रालोआ सरकार जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकार विभाजनकारी आणि विध्वंसक आहे. सरकार देशवासीयांचा विकास सोडून एक देश एक धर्माची संकल्पना रेटून लावत आहे. मात्र, ही बाब योग्य नाही आणि व्यावहारिकही नाही, असे पवार म्हणाले.

धर्मांधतेच्या आधारावर फूट पाडून समाजातील मोठ्या गटाला एकजूट केले तर अन्य वर्ग नाईलाजापोटी त्याच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही, असे सरकारचे विचार आहेत. भारतात वेगवेगळ्या संस्कृती-परंपरेचे लोक राहतात. भाजपप्रणित रालोआ सरकारच्या धोरणांमुळे देशाच्या एकजुटतेला धोका निर्माण झाला आहे. काश्‍मीरमध्ये दहशतवाद फोफावला आहे. काश्‍मीरचे नागरिक रस्त्यावर येवून आंदोलन करीत आहेत. सीमेवर गोळीबार आणि घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. शेतक-यांना दीडपट हमीभाव देण्याचे केवळ दिवास्वप्न दाखविण्यात आले आहे. कृषी विमा हा सुध्दा एक प्रकारचा विश्वासघात आहे. पीक कर्ज घेताच विम्याचे पैसे कापले जातात. परंतु, विम्याचे पैसे शेतक-यांना मिळत नाही, असे ते म्हणाले

पक्ष मोठा नसला तरी आपले विचार उच्च
एक धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष म्हणून आगामी निवडणुकीत आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. राष्ट्रवादी मोठा पक्ष नसला तरी आपले विचार उच्च आहेत. यंदाचे वर्ष संघर्षाचे आहे. ही बाब लक्षात ठेवून निवडणुकीच्या कामाला लागायचे आहे. देशाला धर्मांध शक्तीच्या तावडीतून मुक्त करण्याचे लक्ष्य घेवून काम करा, असे आवाहन पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)