एक दुकानदार गंभीर जखमी : मराठा मोर्चाला हिंसक वळण

दौंड– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषाबाजी करीत दौंड शहरात मराठा समाजातील काही युवकांनी आज (गुरुवारी )अचानक मोर्चा काढाला. त्यानंतर सकाळी 11 वाजता रेल्वे उड्डाण पूल येथे पाटस -दौंड-बारामती रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करीत व्यापारपेठ बंद पाडली. यावेळी दगडफेक करण्यात आल्याने शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला दौंड शहरात हिंसक वळण लागले. या दगडफेकीत एक दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. तर अग्निशामक बंबाची तोडफोड करण्यात आली.
दौंड शहराजवळच्या सोनवडी, गार, गिरीम, बेटवाडी येथील मोर्चातील युवकांनी घोषणाबाजी करीत व्यापारपेठ बंद पाडली. पूर्वसूचना नसल्याने अनेक दुकानदारांना दुकाने बंद करता आली नाही व त्यामुळे काही युवकांनी सुरू असलेल्या दुकानांवर दगडफेक केली. तर दुचाकी वाहनांवर हातात भगवे झेंडे व दगडे घेऊन फिरणाऱ्या जमावामुळे बाजारपेठेत आलेले नागरिक व व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली. रेल्वे उड्डाण पुलाच्या येथे दुचाकीवरील युवती व मुलांसमवेत असलेल्या महिलांना प्रारंभी जाऊ देण्यात आले नाही; परंतु समाजातील वरिष्ठांनी तंबी दिल्यानंतर महिलांसाठी रस्ता खुला करण्यात आला. तर जमावाने घोषणाबाजी करीत मुख्य बाजारपेठेसह दौंड – गोपाळवाडी रस्त्यावरील दुकाने बंद पाडली. पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने हुल्लडबाजी करीत मोजक्‍या समाजकंटकांनी दगडफेक करीत भितीचे वातावरण तयार केले. मोर्चाच्या दरम्यान दुपारी साडेअकरा ते सव्वाबारा या काळात शाळेची वेळ असल्याने आणि प्रमुख रस्ते बंद असल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली. जनता कॉलनी येथील ऋतुविहार अपार्टमेंट मधील मोना मिनी मार्केटचे मोहन खैरे या दुकानदाराच्या तोंडावर दगड मारून त्यांना दुचाकीवरील जमावाने गंभीररित्या जखमी केले.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (दि. 24) शांतता समितीची बैठक घेतली होती. आजच्या मोर्चात दौंड शहराशेजारील गावांमधील बहुसंख्य युवक सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाची सांगता करण्यात आली. दगडफेकीच्या घटनानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्याछन, दगडफेकीच्या घटनानंतर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तर अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तर मोर्चाच्या सांगता झाल्यानंतर वातावरण निवळले होते. या मोर्चावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, पोलीस निरीरक्षक सुनिल महाडिक आदी अधिकारी उपस्थित होते.

  • अग्निशामक बंब, बस फोडली
    दौंड-नगर महामार्गावरील नानवीज फाटा येथे आंदोलकांनी टायर पेटविल्याने ते विझविण्यासाठी गेलेला दौंड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचबरोबर दौंड-श्रीगोंदे या एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या.
  • आंदोलकांचे माणुसकीचे दर्शन
    दौंड शहरात आज सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरळीतपणे सुरू होते त्यामुळे शाळा, महाविद्यालय, बॅंका व इतर व्यावसायिक दुकाने आदी नेहमीप्रमाणे सुरू असल्यापने वर्दळ होती. परंतु अचानकपणे सकाळी 11 वाजता रेल्वे उड्डाण पूल येथे पाटस-दौंड-बारामती रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे दौंड-बारामती, दौंड-नगर व दौंड-पाटस रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान, यावेळी आलेल्या एका रुग्णवाहिकेला आंदोलकांनी मोकळी वाट करून देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)