एका वर्षात 991 फेरीवाल्यांवर कारवाई

  • अतिक्रमण विभाग ः 2278 फ्लेक्‍स व बॅनर जप्त

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पादचाऱ्यांसाठी पदपथ उभारण्यात आले. परंतु अनधिकृत पथारी, हातगाडी, टपरी, तीन-चारचाकीधारक तसेच फ्लेक्‍स यांनी या पदपथांसोबत रस्त्याचाही बराच भाग व्यापला असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा होत आहे. त्यामुळे पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या व रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या 991 जणांवर अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने कारवाई करून सुमारे 28 लाखांचा दंड वसूल केला आहे.

शहराचे अनधिकृत अतिक्रमणामुळे विद्रुपीकरण होत आहे. तसेच वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचा अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने शहरातील निगडी, चिखली, भोसरी, आकुर्डी, वाकड तसेच उपनगरांमध्ये कारवाई करून पदपथावरील अतिक्रमण करणारांचे साहित्य जप्त करून महापालिकेच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील गोडाऊनमध्ये जमा केले आहे.

शहर अतिक्रमणमुक्‍त व्हावे यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अद्यापही सुरू आहे. या विभागाने जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 कालावधीत 991 हातगाड्यांवर कारवाई करून जप्त करण्यात आल्या. तसेच 136 लोखंडी टपऱ्या, 168 लोखंडी काउंटर, 84 तीन व चारचाकी वाहने, 2278 फ्लेक्‍स व बॅनरची जप्ती करण्यात आली आहे. याबरोबरच काही लूज साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

शहरातील रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने हातगाड्या, टपऱ्या तसेच वाहने उभे करून नागरिक व्यवसाय करतात. खाद्यपदार्थ, चप्पल स्टॉल, आइस्क्रीमच्या गाडी, कपडे, शिलाई मशिन, अत्तर, बॉडी स्प्रे, सौंदर्यप्रसाधने तसेच विविध वस्तू रस्त्यांवर विकल्या जातात. त्यामुळे शहरातील वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. ते अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

हमीपत्र व दंड घेऊन साहित्य परत
शहरातील रस्त्यांवर परत अतिक्रमण करणार नाही. अशी हमी दिल्यानंतर त्याच्याकडून दंड वसूल करून साहित्य परत केले जाते. त्यातून एका वर्षात महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाकडे 27 लाख 57 हजार 848 रुपये जमा झाले आहेत.

400 शेड मंडपांवर कारवाई
रस्त्याच्या पदपथावर अनधिकृतरित्या उभारलेल्या पत्रा, चटई, बारदाना, ताडपत्री इत्यादीच्या साहाय्याने उभारलेले शेड मंडप महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून निष्काषित करण्यात आले. एका वर्षात अशा 400 ते 450 शेड मंडपांवर कारवाई करण्यात आली आहे.

2278 फ्लेक्‍स
शहरातील पीएमपी बस स्टॉप, चौक, पदपथावर मोठ्या प्रमाणावर फ्लेक्‍सबाजी करण्यात आली होती. त्यामुळे स्मार्ट सिटीचे विद्रुपीकरण होत होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने 2278 फ्लेक्‍स व बॅनरवरती कारवाई करून जागा मोकळ्या केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.