‘एकादशी’ महागली

मागणी वाढल्याने साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव तेजीत

पुणे – आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात साबुदाणा, खजूर, शेंगदाणा, भगर या उपवासाच्या पदार्थांची आवक झाली असून शहर आणि जिल्ह्यातून मागणी वाढल्याने साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव तेजीत आहेत.

तमिळनाडूतील सेलम जिल्ह्यात साबुदाण्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. संपूर्ण देशात सेलम जिल्ह्यातील साबुदाणा विक्रीसाठी पाठविला जातो. साबुदाण्याची नवीन आवक होण्यास अद्याप दोन ते तीन महिने आहे. त्यामुळे हे भाव तेजीत आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो साबूदाण्याचे भाव 8 हजार रूपये क्विंटल (100 किलो) आहेत. किरकोळ बाजारात साधारणपणे साबुदाण्याची विक्री 80 ते 85 रुपये या भावाने विक्री केली जात आहे. साबुदाण्याचे भाव तेजीत आहेत. उपवासासाठी पनवेल, पेण, नाशिक भागातून भगरची आवक झाली. किरकोळ बाजारात भगरची विक्री 85 ते 90 रुपये या भावाने विक्री केली जात आहे,अशी माहिती भुसार बाजारातील साबूदाणा व्यापारी अनिल नहार यांनी दिली.
आषाढीमुळे शेंगदाण्याचे भावही तेजीत आहेत. सध्या बाजारात शेंगदाण्यांचा तुटवडा जाणवत आहे. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रात शेंगदाण्याचे उत्पादन घेतले जाते. साठे संपत आले असल्याने भाव तेजीत आहेत. दिवाळीनंतर नवीन शेंगदाण्याची आवक होईल. शेंगदाण्याचे भाव प्रतवारीनुसार 8 हजार ते 11 हजार रूपये क्विंटल आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलो शेंगदाण्याची विक्री साधारपणे 100 ते 125 रुपये भावाने केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.