ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेकडे लक्ष

पिंपरी – वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन उद्या पिंपरीत होत आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका ऐकण्यासाठी जिल्हाभरातून सुमारे तीन लाख कार्यकर्ते या महाअधिवेशनाला उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या या सभेकडे जिल्ह्यातील राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष लागले आहे.

वंचित बहुजन आघाडीने सर्वसामान्य नागरिकाला सत्तेत वाटा देण्याचे आश्‍वासन दिले आहे. हे साध्य करण्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी धनगर, माळी, मुस्लिम, मातंग, होलार, मराठा समाजातील वंचित नेतृत्वाला साद घातली आहे. या अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत या सर्व समाज घटकांनी या आघाडीला साथ देण्याचा मानस केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या जाहीर सभेनंतर आतापर्यंत एकाही नेत्याची एच. ए. मैदानावर जाहीर सभा झालेली नाही. वंचित बहुजन आघाडीने ऍड. प्रकाश आंबेडकर यांची सभा याठिकाणी आयोजित करून गर्दीचा उच्चांक मोडण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या सभेला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी माहिती अकील मुजावर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस यंत्रणेकडून या सभेच्या आयोजनाची माहिती घेण्यात आली. अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी सभेच्याठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, अकील मुजावर, के. डी. वाघमारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड, धम्मराज साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

देश अथवा राज्यातील एखाद्या घटनेबाबत ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे वक्‍तव्य महत्वाचे मानले जाते. प्रसारमाध्यमांकडूनही त्याची गांभिर्याने दखल घेतली जाते. याशिवाय कॉंग्रेससोबत आघडीची वाट न पाहता लोकसभा मतदार संघातील उमेदवारी जाहीर करण्यावर आंबेडकर यांनी भर दिला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या अधिवेशनात प्रकाश आंबेडकर नेमके कोणत्या विषयावर बोलणार अथवा कोणत्या लोकसभा मतदार संघातील उमेदवारी जाहीर करणार, याकडे राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष लागले आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाची शक्‍यता
राज्यभरात वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून शहरातील काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा भारिप बहुजन महासंघात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याकरिता काही राजकीय नेते आमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)