ऍट्रॉसिटीच्या नावाखाली श्रीमंतांना वेठीस धरण्याचा फिर्यादीवर आरोप

भाणगाव येथील महिलेस विवस्त्र करून मारहाण प्रकरण

श्रीगोंदे – भानगाव येथील आदिवासी महिलेस विवस्त्र करून मारहाण झाल्या प्रकरणी आज फिर्यादीच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. भानगाव, सुरोडी, वडाळी या गावातील नागरिकांसह तालुक्‍यातील प्रमुख नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला. विशेष म्हणजे आदिवासी समाजातील अनेकांनी यावेळी फिर्यादीवर विविध आरोप करीत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
श्रीगोंदा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहचला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या वतीने अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना यांनी निवेदन स्वीकारले. भानगाव येथील घटना अतिरंजित स्वरूपात माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. या घटनेतील वास्तव वेगळेच असून या प्रकरणाचा निःपक्षपणे तपास करून कोणावर ही अन्याय केला जाऊ नये, अशी मागणी मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी बोलताना संजीव भोर म्हणाले, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांनी वास्तव मांडायला हवे होते. जातीयेतेचा रंग देऊन नगर जिल्ह्याला राज्यभर बदनाम केले जात आहे. आमचा कुठल्याही जातीला विरोध नाही, मात्र खोटे गुन्हे दाखल करून आमचा अंत कोणी पाहु नये. शांततामय मार्गाने मोर्चे निघाले म्हणजे आम्हाला दंडुके हाती घेता येत नाहीत असे कोणी समजू नये.
शिवसेना नेते घनश्‍याम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांची यावेळी भाषणे झाली. या तिघांनी यावेळी सांगितले की, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास आमचा विरोध नाही. तर खोटे गुन्हे दाखल होता कामा नये. घटनेतील वास्तव तपासले पाहिजे. माध्यमांनी दुसरी बाजू दाखवावी. हेतुपूर्वक एकांगी वार्तांकन करणे निषेधार्ह आहे.
यावेळी माजी सैनिक संभाजी कुदांडे व नाना आघाव त्यांची व्यथा सांगताना ढसाढसा रडले. वरील प्रकरणातील फिर्यादी कुटुंब कशा प्रकारे त्रास देत आहे. आपल्याच शेतात जाण्यास ते बंदी करतात. विनयभंग, ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या देतात, तशीच आम्हाला जमीन फुकट द्या अश्‍या मागण्या करून ते ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी सरपंच सुमन चव्हाण, दरकशा काळे, अलका चव्हाण, सुरेश गोरे, संतोष इथापे, आबासाहेब शितोळे, शरद कुदांडे आदींची भाषणे झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जे वास्तव असेल तेच समोर येईल- मीना
अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना म्हणाले, या संदर्भात सगळ्यांची बाजू ऐकून घेऊ. दोन्ही बाजूंचे जवाब नोंदवू. सदर प्रकरणाची चौकशी करून जे वास्तव असेल ते तपासात समोरे आणले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)