ऍग्रो ऍम्ब्युलन्स आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून जैविक पद्धतीने कीड-रोगांबाबत मार्गदर्शन

नारायणगाव- कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव व कृषी विभाग, पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबवत असलेले ऍग्रो ऍम्ब्युलन्स ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्‍यात सध्या उन्हाळी टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर्षी काही भागांमध्ये टोमॅटो पिकांवर मर रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे पिंपळवंडी, उंब्रज, येडगाव, कोल्हेमळा, नांदुरा, चांडोली, हिवरे तर्फे नारायणगाव आणि कांदळी आदी गावांमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

ऍग्रो ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून पिंपळवंडी गावचे सुशांत लेंडे, शांताराम वाघ, महेंद्र काटे, संतोष फुलसुंदर, उंब्रज गावचे दत्तात्रय हांडे, येडगावचे सचिन भिसे, राजू भोर, कोल्हे मळ्यातील वसंत कोल्हे, नांदुरा येथील दशरथ जाधव, चांडोली येथील जयसिंग थोरात, हिवरे तर्फे नारायणगाव येथील विठ्ठल शिंदे आणि कांदळीचे गोरक्षनाथ घाडगे यांच्या शेतावर जाऊन कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत टोमॅटो पिकांवरील खत व्यवस्थापन, मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव, एकात्मिक पीक व्यवस्थापन उद्यान विद्या शास्त्रज्ञ भरत टेमकर, टोमॅटो पिकावरील कीड रोग व्यवस्थापन, पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, पिकांचे नियोजन,कृषी विस्तार शास्त्रज्ञ राहुल घाडगे आणि प्रमुख शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांच्यामार्फत करण्यात आले, तसेच डॉ. दत्तात्रय गावडे यांनी पिंपळवंडी, उंब्रज, येडगाव, नांदुरा, चांडोली, हिवरे तर्फे नारायणगाव आणि कांदळी या गावांमधील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर ऍग्रो ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून जाऊन जैविक पद्धतीने कीड व रोगांचे कमी खर्चातील व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले. कामगंध व चिकट सापळेचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच टोमॅटो पिकांतील मर रोगांचे प्रकार व त्यांचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर ऍग्रो ऍम्ब्युलन्सचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले व त्याचा फायदा शेतकऱ्यांनी 1800 100 7476 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख शास्त्रज्ञ प्रशांत शेटे व डॉ. दत्तात्रय गावडे यांनी केले.

  • ऍग्रो ऍम्ब्युलन्सचे फायदे
    कीड आणि रोग व्यवस्थापनाबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात येते, तसेच कमी खर्चाची व पर्यावरणपूरक कीड रोग व्यवस्थापन पद्धती सुचविण्यात येतात. रासायनिक कीडनाशकांचा योग्य आणि कार्यक्षम वापर करण्याबाबत प्रशिक्षण, चर्चा-मेळावे, उपयुक्त मित्र कीटक, जिवाणू व बुरशी यांची ओळख व फायदे सांगितले जातात. शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन कीड रोगांची ओळख करून देण्यात येते आणि त्यांच्या पर्यावरणपूरक व कमी खर्चामध्ये कसे व्यवस्थापन करता येईल, याच्यावर भर दिला जातो. पीक संरक्षण-किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी, सेंद्रिय शेती, विषमुक्त अन्न उत्पादन, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले जाते.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here