ऊरूळी देवाचीत गोडावून फोडले

सात लाखांचे टायर पळविले

लोणी काळभोर- अज्ञात चोरट्यांनी गोडावूनच्या पाठीमागील भिंत तोडून आत प्रवेश करून 7 लाख 59 हजार 940 रुपये किमतीचे 69 टायर चोरी करून नेले असल्याची घटना ऊरूळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी गोडावूनचे कमर्शियल मॅनेजर अश्विनकुमार अस्तुमीकुमार मिश्रा (वय 45, रा. 10 वा मैल, वडकी, ता. हवेली. मूळ रा. आयाना, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊरूळी देवाची येथील गट क्रमांक 135 /1अ / 4 मध्ये जेके टायर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या टायरचे गोडावून आहे. या ठिकाणावरून पुणे जिल्ह्यासहित औरंगाबाद, सोलापूर, गोवा, मुंबई येथील गोडावूनमध्ये आवश्‍यकतेनुसार टायर पाठवले जातात. हे गोडावून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडले जाते. ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास बंद केले जाते. दि. 4 फेब्रुवारी रोजी मिश्रा यांनी नेहमीप्रमाणे गोडावून उघडले. कामास सुरुवात केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास तेथे काम करत असलेला कामगार राजेंद्र भुजबळ याने त्यांना गोडावूनच्या पाठीमागील बाजूची भिंत तुटलेल्या अवस्थेत आहे, असे सांगितले. मिश्रा यांनी राहुल मोरे, सुहास सोनवणे, एहसान अली पिरजादे या कामगारांसमवेत तेथे जाऊन पाहणी केली. त्यांना गोडावूनची भिंत खालील बाजूला तुटलेली दिसली. गोडावूनमधील मालाची तपासणी केली असता त्यांना 66 हजार 888 रुपये किमतीचे प्रत्येकी 7 हजार 432 रुपये किमतीचे 9 टायर, 6 लाख 46 हजार 408 रुपये किमतीचे प्रत्येकी 11 हजार 543 रुपये किमतीचे 56 टायर व 46 हजार हजार रुपये किमतीचे प्रत्येकी 11 हजार 661 रुपये किमतीचे 4 असे एकूण 7 लाख 59 हजार 940 रुपये किमतीचे 69 टायर कमी असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)