उरुळी देवाची येथील एकाची फसवणूक : अज्ञातावर गुन्हा

लोणी काळभोर- एटीएम कार्ड मालकाच्या स्वतःच्या खिशात असताना व पासवर्ड सांगितला नसतानाही, बनावट एटीएम कार्ड तयार करुन त्याद्वारे एका व्यक्‍तीला तब्बल 33 हजार रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्‍ती विरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
किरण गणपत चव्हाण (वय 30, रा. उरुळी देवाची, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 16 जुलै रोजी रात्री सव्वाअकरा वाजता किरण चव्हाण यांच्या मोबाईलवर त्यांच्या खात्यातून 20 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्या पाठोपाठ 10 हजार व 3 हजार असे एकूण 33 हजार रुपये काढल्याचे तीन मेसेज त्यांना मिळाले. त्यांनी एटीएमकार्ड तपासून पाहिले असता ते खिशातच होते. त्यामुळे कोणीतरी बनावट एटीएम कार्ड बनवून खात्यातून पैसे काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्राला या बाबत माहिती दिल्यानंतर बॅंकेने त्यांचे एटीएमकार्ड दुसऱ्या दिवशी बंद केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी बॅंकेत जाऊन त्यांनी माहिती घेतली असता हे पैसे भाईंदर, मुंबई येथील एटीएम मधून काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र महानोर करीत आहेत.

  • बॅंकांचा दावा ठरला फोल?
    जुन्या एटीएम कार्डचे क्‍लोनिंग करून पैसे काढण्यात येतात हे लक्षात घेऊन बॅंकांनी अत्याधुनिक चिप टाकलेले नवीन एटीएम कार्ड वापरात आणले आहेत. या चिप असलेल्या कार्डचे क्‍लोनिंग करता येत नाही असा बॅंकांचा दावा आहे. गुन्हेगार मात्र बॅंकांच्या एक पाऊल पुढे आहेत. नवीन कार्डचे क्‍लोनिंग करुन त्यांनी बॅंकांना आव्हान दिले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. असे होत असेल तर कॅशलेस इंडियाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हा मोठाच प्रश्‍न आहे अशी चर्चा नागरिक करीत आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)