उरुळी कांचन परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी

उरुळी कांचन- जुना मुळा-मुठा कालव्यामध्ये (बेबी कालवा) मुंढवा येथील जॅकवेलमधून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कालवा परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जादा पाणी वाहून नेण्याची क्षमता नसताना देखील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे, त्यामुळे सोरतापवाडी, कुंजीर वाडी, उरुळी कांचन येथील पूल कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोरतापवाडी येथील रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेबी कालव्याचे पाणी आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, त्यामुळे बेबी कालव्याचे पाणी कमी करावे, अशी मागणी सोरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चौधरी, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सागर चौधरी, बाजार समितीचे माजी उपसभापती तानाजी चौधरी यांनी केली. पाणी कमी केले नाही तर उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
हवेली आणि दौंड तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळावे, या हेतूने सुमारे चाळीस वर्षांपासून बंद असलेला बेबी कालवा मागील दोन वर्षापासून सुरू करण्यात आला. कालवा सुरू करत असताना कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे जरुरीचे होते. यामध्ये कालव्याच्या आतील बाजूस वाढलेले गवत काढणे, कमी-अधिक उंची असलेल्या कालव्यांच्या भारावांची दुरुस्ती करणे आणि कालव्याच्या ठिकाणच्या सर्व पुलांची उंची वाढविणे अपेक्षित होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत खडकवासला पाटबंधारे विभागाने घाईघाईने कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सुरुवातीच्या काळात कमी दाबाने पाण्याचा प्रवाह असल्याने पाणी व्यवस्थित हवेली तालुक्‍याच्या हद्दीपर्यंत पोहोचले. काही कालावधीनंतर जॅकवेलच्या पंपांची संख्या वाढविल्याने कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी कालवा परिसरात पाझरू लागले. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी आणि उरुळी कांचन गावांच्या हद्दीमध्ये कालवा गळतीचे प्रमाण वाढू लागले. त्यातच क्षमतेपेक्षा अधिक पाणी कालव्यात सोडल्याने कुंजीरवाडी, सोरतापवाडी परिसरात शेतीचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची अशी माहिती एकनाथ चोरगे आणिआप्पासाहेब लोणकर यांनी दिली.
अशाच प्रकारे अनेकदा कालव्याच्या गळतीचे प्रकार वारंवार घडत आहेत. या सर्वांची कल्पना शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला दिली. मात्र, पाटबंधारे विभागाकडून त्यावर ठोस कारवाई झाली नाही. अशी माहिती सोरतापवाडी येथील तंटामुक समितीचे अध्यक्ष मोहन चौधरी यांनी दिली.

  • कालव्याचे पाणी नागरी वस्तीत
    रविवारी (दि. 28) पासून कालव्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी कालव्यामध्ये सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी कालव्याचे पाणी नागरी वस्ती, शेतामध्ये आणि रस्त्यांवर आले. कालव्यामधून जड पाणी सोडण्यात आल्याने गावामध्ये अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. तसेच या भागात अनेक मजुरांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांना घरामध्ये राहणे कठीण झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व घटनेची माहिती देऊन देखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
    गणेश चौधरी, माजी उपसरपंच, सोरतापवाडी
  • सध्या या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पाणी कमी सोडण्यात यावे, असे पत्र पाटबंधारे विभागाला दिले आहे. निम्या रस्त्याचे काम झाले आहे. आज उपळ वस्ती भाई के. डी. चौधरी वस्तीसह भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे या भागात होत असलेले डांबरीकरण खराब होत आहे. पाटबंधारे विभागाला पत्र देऊनही त्यांनी जास्त प्रमाणात पाणी सोडले आहे. त्यामुळे आम्ही आता उपोषण करणार आहोत
    सुदर्शन चौधरी, सरपंच, सोरतापवाडी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)