उरुळी कांचनमध्ये काही काळ तणाव

उरूळी कांचन- मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे आज (दि. 30) झालेल्या हवेली बंदच्या आंदोलनादरम्यान उरुळी कांचन (ता.हवेली ) येथे आंदोलनकर्ते आणि व्यापाऱ्यांमध्ये अल्पसा वाद झाला. सकाळी दहा वाजता काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती. मात्र, एक तासानंतर दुकाने बंद करण्यात आली.
मराठा संघटनांनी महात्मा गांधी रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते. याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत सकाळी ताणवाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने हे प्रकरण शांततेने हाताळल्याने परिस्थिती लगेचच नियंत्रणात आली. यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक उरुळी कांचन शहरात तैनात करण्यात आली आली. मराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंद करण्याच्या आवाहनास उरुळी कांचन शहरात सकाळपासून संदिग्ध भूमिका ग्रामस्थांत होती. शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापाऱ्यांकडून स्वतःहून दुकाने बंद ठेवण्यात आली होती; परंतु, महात्मा गांधी रस्तावरील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरळीत सुरू केले होते. मराठा संघटनांच्या सुमारे पन्नासहून अधिक आंदोलनकर्त्यांनी महात्मा गांधी रस्ता मार्ग येथे येऊन व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या बंदच्या आवाहनास काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. यादरम्यान व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तसेच आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत पुणे-सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकात निषेध सभा घेऊन बंदच्या आवाहनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी काही खासगी शाळा बंद ठेवल्या आहेत, तर आरोग्य सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली असून, पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)