#उमेद: मात न्यूनगंडावर

अमोल भालेराव

प्रत्येकालाच आपण अगदी परफेक्‍ट असायला हवं आणि दिसायला पण हवं असं वाटत असते. असं वाटण्यात काही वावगं नाही; परंतु आपण जसे आहोत, तसे स्वतःला स्वीकारणारे फार कमी लोक असतात. या लोकांच्या मते “परफेक्‍ट” या शब्दाला त्यांच्या दिसण्यात आणि असण्यात तसे कमीच महत्त्व असते आणि म्हणूनच ते लोक समाधानी असतात.
णीव कोणामध्ये नसते ? पण आपल्यातच काही कमतरता आहे, काहीतरी वेगळेपण आहे ही भावना मनात खोलवर रुजल्यामुळे जो भाव निर्माण होतो, त्यालाच न्यूनगंड असे म्हणतात. पण प्रश्‍न हा आहे, की हा न्यूनगंड येतो कुठून? माणूस जेव्हा स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करू लागतो, अगदी त्याच वेळेत त्याच्या मनात न्यूनगंडाने जागा तयार केलेली असते. मग ती तुलना कशाचीही असेल. दुसऱ्याच आयुष्य आपल्यापेक्षा किती सुखकर आहे, एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा किती यशस्वी आहे, समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा किती रुबाबदार व सुंदर दिसते…. अशा एक ना दोन, अनेक गोष्टी असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावाकडील लोकांमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडचे प्रमाण जरा जास्तच पाहायला मिळते. तसं पाहायला गेलं तर गावाकडील मुलं खूप हुशार असतात, त्यांच्या स्वभावात समोरच्याविषयी आदर आणि आपलेपणाची भावना लगेच दिसून येते. खंत एवढीच की, त्यांना दिशा दाखविणारे लोक समाजात कमी असतात. हीच मुलं जसजशी मोठी होऊ लागतात तशी ती भरकटतात, शहरातील मुलांशी स्वतःची तुलना करायला लागतात. शहरातील मुलांची जीवनशैली, त्यांचं राहणीमान आणि आपली जीवनशैली, आपलं राहणीमान किती भिन्न आहे, या विचाराने त्यांच्यातील आत्मविश्‍वास कमी होऊ लागतो. ती मुलं आपल्यापेक्षा किती हुशार आहेत, त्यांचं इंग्रजी किती छान आहे अशा किती तरी बारीकसारीक गोष्टींची तुलना होऊ लागते. आणि यात कमी म्हणून की काय, त्यांचे पालक याच न्यूनगंडला खतपाणी घालतात.

“अमुक एक मुलगा तुझ्यापेक्षा बघ किती हुशार आहे…त्याचा शाळेत नेहमी पहिला नंबर असतो….तो खेळात पण पुढेच राहतो…..त्याचं इंग्रजी – सामान्यज्ञान तुझ्यापेक्षा किती जास्त आहे. तुला मात्र काही येत नाही. अगदी ढ आहेस तू..” असे जेव्हा पालक मुलाला बोलतात त्याच वेळेस त्या मुलाने त्याच्या मनात पक्के ठरविले असते की, खरंच आपण असेच आहोत आणि पर्यायाने त्याच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळत नाही, त्याच्यातील उमेदीला भरारी देण्याऐवजी त्याचे आत्मविश्‍वासाचे पंखच कापले जातात.

मी म्हणतो, स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करण्यापेक्षा स्वतःशीच केली तर ? स्वतःमधील चांगल्या गोष्टींना वाव देऊन आणि वाईट गोष्टींना दूर करून बदल घडविता येईलच की. स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडता आले पाहिजे. स्वतःला प्रेरित करून आत्मविश्‍वासाने जगाकडे पाहता आले की, मग आपल्यालाच आपलं अस्तित्व जाणवू लागतं. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हा संकोच करत बसण्यापेक्षा आपल्यातील वेगळेपण सिद्ध करून यशस्वी होण्याचा चंग मनाशी बांधता आला की न्यूनगंडरूपी काळोखाला कुठे जागाच नाही उरणार !

चला, एक छोटासा प्रयोग करूया. एका कोऱ्या पानावर दोन कॉलम आखूया. एका बाजूला स्वतःबद्दल आवडणाऱ्या व दुसऱ्या बाजूला न आवडणाऱ्या गोष्टींची यादी करूया. स्वतःबद्दल आवडणाऱ्या गोष्टींची यादीच मोठी असेल, हो ना ? मग न आवडणाऱ्या नगण्य गोष्टीमुळे आपल्यातीलच चांगल्या गुणांकडे आपण दुर्लक्ष केले, तर नुकसान आपलेच. खरं पाहायला गेलं तर आपलं व्यक्तिमत्व प्रथमतः आपल्या मनात तयार होत आणि मग समोरच्या व्यक्तीच्या मनात. म्हणूनच सुरुवात करूया स्वतःपासूनच. स्वतःमधील न्यूनगंड बाजूला करूया आणि नव्या उमेदीने हे जग जिंकायला सज्ज होऊ या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)