उपमुख्यमंत्रिपदापासून अजित पवार लांबच

भाजपची डोकेदुखी वाढली ः राष्ट्रवादीकडून मन वळविण्याचे प्रयत्न सुरुच
फडणवीस यांनी मुख्यमिंत्रपदाचा पदभार स्विकारला

मुंबई :  राष्ट्रवादी कॉंग्रेसशी बंडखोरी करीत भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार अद्यापही स्विकारलेला नाही. तर दुसरीकडे त्यांनी पुन्हा स्वगृही परतावे यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्न सुरुच असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारत कामाला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीशी बंडखोरी करीत आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देत ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजपला सत्ता स्थापण्यासाठी मदत केली. आमदारांच्या पत्रामुळे भाजपने शनिवारी भल्या पहाटे राजभवनावर शपथविधी सोहळा उरकला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. अचानक घडलेल्या या राजकिय घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपने सत्ता स्थापन केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या घटनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला होता.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली भेट
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवेंद्र फडणवीस व अजित पवार विधानभवनात उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील व छगन भुजबळ उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या कार्यक्रमानंतर फडणवीस मंत्रालयात गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या केबिनमध्ये अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. ही बैठक अडीच तास झाली. या सर्व नेत्यांनी अजित पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. त्यांचे मन वळविण्याचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.