उपचारांमुळे मादी बिबट्यास जीवनदान

बिबट निवारण केंद्राच्या प्रयत्नाला यश

जुन्नर – जानेवारी महिन्यात इगतपुरीजवळ एका वाहनाच्या धडकेने पाच महिन्याच्या मादी बिबटाचे चारही पाय निकामी झाले होते. कुठल्याही उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे या अपंगत्व आलेल्या पिल्लाला माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख आणि त्यांच्या टीमने केलेल्या अथक प्रयत्नांना तीन महिन्यानंतर यश मिळाले आहे. या मादी बिबटाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

माणिकडोह (ता. जुन्नर) येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना या पिल्लाला कोठेही फॅक्‍चर नसल्याचे चाचण्यांमध्ये आढळले, त्यामुळे पायांतील नसांना इजा झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले. या मादी बिबटावर प्राण्यांच्या उपचारामध्ये सहसा न वापरली जाणारी फिजिओथेरपी आणि मसाज थेरपीने उपचार करण्याचे येथील टीमने निश्‍चित केले. या उपचार पद्धतींमुळे हे पिल्लू काही दिवसात पाय हलवायला लागले आणि पुढील महिन्यात चालू लागले. अगदी पोटच्या पोरासारखी काळजी घेणाऱ्या येथील कर्मचाऱ्यांच्या कष्टाला फळ येत होते. काही महिन्यात ती पूर्णपणे तंदुरुस्त झाली आणि तिला पुन्हा जंगलात सोडण्यात आले.

पुनर्जन्म झालेल्या या मादी बिबटाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक आवासात सोडताना माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे कर्मचाऱ्यांची मनस्थिती नाजूक झाली होती. या तीन महिन्यांमध्ये या पिल्लासोबत येथील कर्मचारी आणि डॉक्‍टर यांच्यात भावनिक संबंध निर्माण झाले होते. या घटनेमुळे बिबट निवारण केंद्रांचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.