उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट

शिरूर, हवेलीतील अर्थकारण कोलमडले : भाकड जनावरांचा हंगाम, दुष्काळाचा परिणाम

पाबळ- शिरूर, हवेली तालुका उन्हाळ्यामुळे तापला असताना दूध संकलनात मोठी घट आली आहे. त्यात चारा आणि पाण्याचा प्रश्‍न ज्वलंत झाला आहे. त्याचा परिणाम दूध संकलनावर झाला आहे. उन्हाळ्यात दूध संकलनात प्रति गाय, म्हैस यामध्ये किमान तीन ते चार लीटरची तफावत येत असल्यामुळे शिरूर- हवेली तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

यंदा शिरूर तालुक्‍यात दुष्काळजन्य स्थिती आहे. त्यात शिरूर तालुक्‍यात सर्वाधिक टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 21 टॅंकरने तालुक्‍यातील गावांत तसेच वाड्या- वस्त्यावर पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. त्याचा परिणाम पशूधनावर झाला आहे. पिण्याच्या पाण्याची भ्रांत असल्यामुळे पशूधनाला पाणी कोठून, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. तालुक्‍यातील गावांत तसेच वाड्या- वस्त्या पाण्यासाठी व्याकूळ आहेत. त्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्तीच्या वाटेवर आहे. तसेच जिल्ह्यात एकूण चार साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यांपासून पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शिरूर तालुक्‍यातील नदीकाठची गावे वगळता इतर गावांत दुष्काळाने डोके वर काढले आहे.
शिरूर- हवेली तालुक्‍यातील सहकारी आणि खासगी दूध संकलनात केंद्रात संकलनाची आकडेवारीत घट झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी संकलन चालकांकडून उचल घेतात. त्याची परतफेड करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. त्यात दोन महिने घाट्यातील व्यवसाय करावा लागत असल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

  • पशूखाद्य, चाऱ्यावर खर्च
    शिरूर, हवेली तालुक्‍यातील शेतकऱ्यांना जनावरांवर खर्च करावा लागत आहे. आमदनी अठ्ठणी आणि खर्चा रुपया, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे दूध संकलनात घाटा, उत्पादन खर्च जादा, अशी केवीलवाणी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. पशूखाद्याचे वाढते दर, सुका आणि ओला चाऱ्यासाठी करावा लागणारा खर्च, पाणीटंचाई यात पशूधन होरपळून निघत आहे. चाऱ्यासाठी जादा किंमत मोजून खरेदी करावी लागत आहे. तसेच अजून दोन महिने पशूधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार असल्यामुळे अर्थकारण कोलमडून पडत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.