उद्योगांपाठी कॉस्टिंगचे शुक्‍लकाष्ठ

  • समस्यांचे चक्रव्यूह ः बाहेर पडण्यासाठी लघु-मध्यम उद्योजकांची धडपड

भाग – 1
पिंपरी – उद्योग नगरीत सध्या संमिश्र वातावरण पहावयास मिळत आहे. काही उद्योग आर्थिक चक्रव्यूहात अडकले आहेत, तर उर्वरीत उद्योगांकडे अडकलेल्या उद्योगांचे काम येऊ लागले आहे. परंतु सध्याची स्थिती खूपच विदारक असल्याचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक सांगत आहेत. ज्यांच्याकडे काम आहे, त्यांचीही अवस्था भविष्यात बिकट होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. बड्या कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांची कॉस्ट रिडक्‍शन पॉलिसीने कित्येक लघु आणि मध्यम उद्योगांना अडचणीत आणले आहे. कोणत्याही भागात एखादी बडी कंपनी आली की, हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकसित होऊ लागतात. बड्या कंपनीला हजारो पार्टस्‌चा पुरवठा करणारे हे लहान उद्योग बड्या कंपन्यांच्या प्रगतीबरोबर बाळसं धरतात. गेल्या पाच दशकात या शहराने सर्व प्रकारच्या उद्योगांची भरभराट पाहिली आहे; परंतु अलीकडच्या काळात प्रतिस्पर्धा आणि कमीत कमी खर्चात उत्पादन करण्याच्या हव्यासाने लहान उद्योगांचा घास हिरावण्याचे काम सुरू केले आहे. त्यातच सध्याची स्थिती देखील लघु उद्योगांसाठी मारक ठरत आहे.

दर कमी करण्याची स्पर्धा
मुख्य उत्पादन बाजारात आणणाऱ्या कंपनीस ओईएम अर्थात ओरिजनल इक्‍युपमेंट मॅन्युफॅक्‍चरर असे म्हटले जाते. या ओईएमला लहान उद्योग वेगळे-वेगळे पार्टस्‌ सप्लाय करतात. या पार्टस्‌ला जोडून ओईएम म्हणजेच बडी कंपनी आपले फायनल प्रॉडक्‍ट बाजारात आणते. सध्या बड्या कंपन्यांमध्ये नफा वाढवण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरु आहे. नफा वाढवण्यासाठी उत्पादन वाढविण्यासोबत उत्पादनावर होणारा खर्च कमी करणे हा सर्वांत मोठा प्रयत्न असतो. या कामासाठी कंपन्या गलेलठ्ठ पगार देऊन नव-नवीन अधिकारी भरती करतात. हे अधिकारी सर्वांत पहिला भार लघु उद्योजकांवर टाकतात आणि सुरु होतो रेट रिडक्‍शनचा खेळ. अधिकारी उद्योजकाला त्याच्या उत्पादनाचे कागदावर कॉस्टिंग काढून दाखवतात आणि दर कमी करण्यास भाग पाडतात. कागदावरील कॉस्टिंग आणि फॅक्‍ट्री फ्लोअरवरील कॉस्टिंग यामध्ये जमीन-आसमानाचे अंतर असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑर्डर पूर्ण करणे अवघड
कमी केलेल्या दरांमध्ये ऑर्डर पूर्ण करणे लघु आणि मध्यम उद्योजकांना अवघड होत आहे. अशा स्थितीत ओईएम या उद्योजकांच्या गुंतवणुकीचा व आजवर त्यांनी कंपनीला केलेल्या सहकार्याचा कोणताही विचार न करता दुसरा व्हेंडर डेव्हलप करते. अर्थात ओईएमला हवे असलेले मटेरियल दुसऱ्या उद्योजकाकडून बनवून घेते. आपल्या नवीन ऑर्डर मिळत आहे, टर्नओव्हर वाढेल या अपेक्षेने नवा उद्योजक कमी दरात ऑर्डर स्विकारतो. परंतु पुढे जाऊन त्यालाही ऑर्डर पूर्ण करुन उद्योग चालवणे अवघड जाते. शहरात ओईएम मोजक्‍याच आहेत आणि त्यांना मटेरियल सप्लाय करणारे हजारोंच्या संख्येत आहेत, त्यामुळे वारंवार उत्पादक बदलण्यात ओईएमचे अधिकारी संकोच करत नाहीत.

नंबर गेम आणि इन्वेंटरी कंट्रोल
ओईएमकडून नव्या उत्पादकांना सांगितले जाते की तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळेल. उत्पादन वाढले की डायरेक्‍ट आणि इनडायरेक्‍ट ओव्हरहेड्‌स कमी होतील. याचे सुंदर गणित ओईएमचे अधिकारी कागदावर सादर करुन नव्या लघु आणि मध्यम उद्योजकांना दाखवतात. परंतु प्रत्यक्षात तेवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत नाही आणि ओव्हरहेड्‌सही कमी होत नाही. गेल्या एका दशकापासून प्रत्येक कंपनी इन्वेंटरी कंट्रोल करण्याच्यामागे धावत आहे. प्रत्येक ओईएमला आपल्या स्टोअररुममध्ये अत्यंत कमी स्टॉक ठेवायचा आहे. जेवढा जास्त स्टॉक असतो तेवढे बिल अधिक पेड करावे लागते हे साधे गणित आहे. यासाठी ओईएम जेव्हा आपल्या व्हेंडर्सला पर्चेस ऑर्डर रिलीज करतात तेव्हा शेड्युल अशा प्रकारे बनविले जाते की प्रत्येक व्हेंडरला माल घेऊन रोज किंवा दिवसाआड कंपनीच्या दारात पोहचावे लागते. एबीसी आणि एक्‍सवायझेड ऍनिलिसिसच्या नावाखाली पार्टसच्या त्याच्या दराप्रमाणे वेगवेगळ्या भागात विभागाले जातात. ओईएम आपल्याकडे असणारी ऑर्डर त्यानुसार होणारे रोजचे उत्पादन पाहून शेड्युल तयार करते. ए कॅटेगिरीत येणाऱ्या मटेरियलचा कमीत कमी स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोज लघु उद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागते. रोज मटेरियल घेऊन कंपनीत जायचे, इंस्पेक्‍शनमध्ये मटेरियल रिजेक्‍ट होणार नाही याची काळजी घ्यायची अशी कित्येक कामे रोजच्या रोज करावी लागतात, यामुळे ओईएमचा खर्च कमी होत असला तरी लघु उद्योजकांचा खर्च आणि त्रास मात्र वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)