उद्योगपतींची साथ असल्याबद्दल भीती वाटत नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

लखनौ: देशातील उद्योजकांना विरोधकांनी “चोर आणि लुटेरे’ संबोधल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परखड शब्दांमध्ये टीका केली. नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सीसारख्या उद्योजकांच्या सानिध्यात राहिल्याबद्दल आपल्यावर जी टीका होते, त्याची आपल्याला भीती वाटत नाही. देशातील उद्योजकांचा हेतू स्पष्ट आहे. देशाच्या प्रगतीसाठी उद्योजकांनी लावलेला हातभार लावलेला आहे. त्यांच्यावर माझा भरवसा आहे, असे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशात 81 वेगवेगळ्या विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
उद्योजकांबरोबर उघडपणे सानिध्यात राहायला घाबरणारे लोक पडद्याआडून त्यांचीच मदत घेत असतात. जर तुमचा हेतू स्वच्छ असेल, तर केवळ एखाद्याबरोबर उभे राहिल्याने कोणताही कलंक लागू शकणार नाही. जर या उद्योजकांकडून देशाच्या विकासाला हातभार लागत असेल, तर मग या उद्योजकांना “चोर आणि लुटेरे’ का म्हणायचे, असा सवालही पंतप्रधानांनी उपस्थित केला. महात्मा गांधी आयुष्यभर बिर्ला हाऊसमध्ये राहिले, पण त्यांचा हेतू स्वच्छ होता, असे उदाहरणही मोदींनी दिले. आपल्यावर विरोधकांकडून ज्या विषयांसाठी टीका केली जात आहे, त्याच्या चुका 70 वर्षांपूर्वीच झाल्या आहेत. आपण केवळ चार वर्षे सत्तेत आहोत. पण विरोधक 70 वर्षे सत्तेत होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
उत्तर प्रदेशातल्या 81 प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज लखनौ इथे झाले. 60000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे हे प्रकल्प आहेत. राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी 2018 मधे आयोजित करण्यात आलेल्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेनंतरच्या काही महिन्यातच या प्रकल्पांना मूर्त स्वरुप मिळण्यासाठी चालना प्राप्त झाली.
प्रस्तावापासून भूमीपूजनापर्यंत ज्या गतीने या प्रकल्पांचा पाच महिन्यात प्रवास झाला आहे. तो प्रशंसनीय आहे, असे म्हणून या कामगिरीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया या सारख्या उपक्रमांना, या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागातल्या तीन लाख सामाईक सेवा केंद्रामुळे, जनतेला प्रभावी आणि पारदर्शी सेवा मिळून ग्रामीण भागातल्या जनतेच्या जीवनात परिवर्तन घडत आहे. तोडगा काढण्यावर आणि समन्वयावर केंद्र सरकारचा भर आहे.
मोबाईल फोनची निर्मिती करणारा भारत हा दुसरा मोठा देश ठरला आहे. या उत्पादन क्रांतीमधे उत्तर प्रदेश अग्रस्थानी आहे. पायाभूत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, भारतात व्यापार करणे अधिक सुलभ होणार असून, वाहतूक खर्चातही कपात होईल, उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे. देश, पारंपरिक उर्जेकडून हरित उर्जेकडे वाटचाल करत असून, उत्तर प्रदेश हे सौर ऊर्जेचे केंद्र ठरेल. देशाच्या ऊर्जा क्षेत्रातली तूट 2013-14 मधल्या 4.2 टक्क्‌यावरुन कमी होऊन ती आता एक टक्क्‌यापेक्षाही कमी झाली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)