उद्याच्या पायलचा बळी आपल्या घरातून असेल!

डॉक्‍टर म्हटले की आपल्या समोर उभे राहते ती देवत्वाचा भाव जपणारी एक वेगळी ओळख. या ओळखीमध्ये जात, वर्ण, धर्म, लिंग आदी बाबींवरून कधीही भेदभाव होताना दिसत नाही. मात्र, मुंबईतील नायर रुग्णालयात प्रसूतिशास्त्र या वैद्यकीय विद्याशाखेत उच्च शिक्षण घेणाऱ्या काही महिला डॉक्‍टरांनी आपल्या जुनाट आणि दरिद्री मानसिकतेतून एका आदिवासी समाजातून प्रचंड संघर्ष करून डॉक्‍टर झालेल्या पायल तडवी या मुलीचा बळी घेतला!

मुंबईसारख्या जगाला सामावून घेणाऱ्या स्वप्ननगरीमध्ये उच्चशिक्षण घेऊन रुग्णसेवेचे स्वप्न उराशी बाळगत आपल्या पतीसह पायल मुंबईला आली. ती एमबीबीएस डॉक्‍टर होती. तसेच तिने काही काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवाही दिली होती. मात्र, आपल्या विषयामध्ये उच्चशिक्षण घेऊन अधिक चांगल्याप्रकारे काम करता येईल म्हणून तिने एम.डी.ची परीक्षा गुणवत्तेवर उत्तीर्ण होत, नायर रुग्णालयात प्रवेश मिळविला. घरची परिस्थिती जेमतेम असताना तिने स्वत: अभ्यास करून हे यश मिळविले होते. आदिवासी समाजातील पायल ही पहिली प्रसुतितज्ञ महिला डॉक्‍टर बनणार होती. मात्र, समाजातील काही दरिद्री मानसिकता जपणाऱ्या लोकांना असे गरीब घरातील विद्यार्थ्यांचे यश रूचत नाही, त्यांना ते पचत नाही. म्हणून मग ते जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांचा छळ करतात. डॉ.पायल ही त्याचाच बळी ठरली.

आपण चंद्रावर जाण्याच्या, महासत्ता बनण्याच्या गोष्टी करतो मात्र, आपल्याला स्वातंत्र्य मिळून सात दशके झाली तरी जातीय उतरंड मात्र संपुष्टात आलेली नाही. हे डॉ.पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्‍टरांच्या मानसिकतेतून समजते. इतके उच्चशिक्षण घेऊनही जर जात आपल्या जगण्यातून जात नसेल तर हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश आहे. महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे प्रतिनिधित्व करतो. मात्र, समाजात घडणाऱ्या अशा घटना पाहिल्या की, आपण जाती अंताची लढाई अद्याप जिंकलेली नाही हे सिद्ध होते. ही मानसिकता समूळ नष्ट होण्यासाठी व्यवस्थेची भूमिका महत्वपूर्ण असताना जर ही व्यवस्थाच आज अशा घटनांना खतपाणी घालत असेल तर सामान्य माणसांनी जगावे कसे, असाही प्रश्‍न निर्माण होतो. कारण डॉ. पायल यांनी प्रवेश घेतल्यापासून त्यांना त्यांच्या जातीवरून टीका टिप्पणी सहन करावी लागत होती. सुरूवातीस त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, ज्यावेळी हा त्रास त्यांना असह्य झाला त्यावेळी त्यांनी तो आपले पती आणि आईस सांगितला. त्यांनी स्वत:, त्यांच्या पतीने तसेच आईने रुग्णालयाचे अधिष्ठाते, प्राध्यापक यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे पायल यांना त्रास देणाऱ्या त्या तीन महिला डॉक्‍टरांच्या दुष्कृत्यांना पायबंद बसण्यापेक्षा पाठींबाच मिळाला.

डॉ.पायल यांच्या आईने डॉ.भक्ती मेहरे, डॉ.हेमा आहुजा आणि डॉ.अंकिता खंडेलवाल यांच्यावर पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या तिन्ही आरोपी विरोधात त्यांनी ऍट्रॉसिटी आणि रॅगिंग विरोधी कायद्यातील विविध कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे. रॅगिंगच्या विरोधात कठोर कायदा असतानाही केवळ त्याच्या योग्य अंमलबजावणी अभावी अशा घटनांना खतपाणी मिळताना दिसते. प्रत्येक महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांच्या नियमांचे फलक लावलेले दिसतात. मात्र, जे विद्यार्थी रॅगिंग करतात त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. आजही रॅगिंगसारख्या अपमानास्पद कुप्रथांचे बळी असंख्य विद्यार्थी ठरत आहेत. ज्याला पायल याही बळी पडल्या. महिलांना प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. आदिवासी समाजात जन्म ते एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण आणि आता एम.डी. शिकून पायल प्रसूतीतज्ञ म्हणून चांगले काम करू शकल्या असत्या. मात्र, आपल्या सहकारी स्त्री डॉक्‍टरांच्या असह्य जाचाला कंटाळून पायल यांना आपले जीवन संपवावे लागले.

तुला शिकू देणार नाही, तुला इथून पळवून लावणार, तू आरक्षित वर्गातून आलीस, तुला प्रसूती करण्याचा अधिकार नाही, तू आमचे सगळे कामे करायचे, तुला हसण्यावर बंदी आहे या प्रकारच्या बोलण्यातून त्या वरिष्ठ महिला डॉक्‍टरांनी पायल यांना हिणविण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी जातीवाचक बोलून त्यांना भेदभावाची वागणूक दिली. याच सामाजिक विषमतेतून आत्मसन्मानाची लढाई लढणाऱ्या डॉ.पायल यांना जीवन संपवावे लागले असा आरोप होतोय. अशा असंख्य पायल, रोहित वेमुला आणि जाती व्यवस्थेच्या छळाला त्रासून जीवन संपविणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले जीवन संपवावे लागणार नाही. यासाठी जाती अंताची लढाई भारतीय म्हणून प्रत्येकाला लढावी लागेल. अन्यथा, उद्याच्या पायलचा बळी आपल्या घरातून असेल!

– श्रीकांत येरूळे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×