उद्धव ठाकरे अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेणार

वाराणसीत गंगेची स्वच्छताही पाहणार


शिवसेनेची मुंबईत पोस्टरबाजी

मुंबई – “छत्रपतींचा आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ…’ अशी घोषणा देत भाजपने 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत भाजपाला चांगले यशही मिळाले.

आता त्याच पार्श्वभूमिवर भाजपची कोंडी करण्यासाठी आगामी 2019 मधील निवडणूका स्वबळावर लढण्याचा इरादा असलेल्या शिवसेनेने हालचाली सुरु केल्या आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर “चलो अयोध्या, चलो वाराणसी’ देशाच्या राजकारणातील महत्वाचे पाउल… असे लिहिलेले पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी लावले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या चार वर्षात अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सोडवलेला नसल्याने शिवसेनेने त्यावर संताप व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचे कार्ड चालविण्याआधीच या मुद्‌द्‌यावरून भाजपची कोंडी करण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या आहेत.

ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा करून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. राम मंदिराचे काम कधी सुरू होईल, कधी काय होईल मला माहिती नाही. पण माझी स्वत:ची इच्छा आहे, मी अयोध्येला जाऊन येणार आहे. रामजन्मभूमीच्या इथे जाऊन रामलल्लांचे दर्शन घ्यायचे आहे. माझी अयोध्येत जाण्याची इच्छा असून लवकरच अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. अयोध्येला पण जाणार आणि वाराणसीलाही जाईन, असे सांगतानाच “गंगा नदी किती साफ झाली हे सुद्धा मला बघायचे आहे,’ असा खोचक टोलाही त्यांनी भाजपला हाणला आहे.
कोंडीत पकडण्याची खेळी

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे थेट पंतप्रधानांच्याच मतदारसंघात राममंदिराच्या मुद्यावरून आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करून शिवसेना भाजपाला कोंडीत पकडू शकते. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राममंदिर, हिंदुत्व या मुद्यांची अडचण होउ शकते. नेमके हेच हेरून शिवसेनेने ही खेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)