उद्घाटना वेळीच “सीएनजी बस ब्रेकडाऊन’ ?

file photo

विद्यार्थ्यांना मारली ई- बस मधून फेरी

पुणे : शहरात दाखल होऊनही तब्बल महिनाभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने पीएमपीच्या ई बस तसेच सीएनजी बसेस शहरात थांबून ठेवण्यात आल्या. ही बाब समोर येताच; मुख्यमंत्री कोल्हापूर आणि सांगलीतील महापूरामुळे उद्घाटनास येऊ शकत नाहीत. असे कारण देत, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पीएमपी आणि महापालिकेकडून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, उद्घाटनाच्या दिवशीचा या कार्यक्रमासाठी आणलेली नवी कोरी सीएनजी बस चक्क सुरूच झाली नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडल्याचा प्रकार आता समोर आला आहे.
पीएमपीच्या ताफ्यात नवीन 450 ई बस तसेच 400 सीएनजी बस येणार आहेत. पहिल्या 25 नवीन ई- बस असल्याने शहरात आणखी 125 ई बस आल्या आहेत. तर 50 सीएनजी बसची खरेदी पीएमपीने केली आहे. या बसेसचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महापालिकेच्या इमारतीसमोरील बस स्थानकावर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरीक, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले.

काय घडला प्रकार
प्रशासकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी एक सीएनजी तर ई- बस आणण्यात आली होती. उद्घाटनावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरिष बापट यांच्यासह, महापौर मुक्ता टिळक हे ई बस मध्ये बसले तर विद्यार्थ्यांना सीएनजी बस मध्ये बसविण्यात आले. या दोन्ही बस एका मागोमाग जाऊन फेऱ्या मारून येणार होत्या. ई बस निघाल्यानंतर सीएनजी बसही निघणे अपेक्षीत होते. मात्र, ही बसच सुरू होत नव्हती. सुमारे 5 ते 10 मिनिटे ही बस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र,ती सुरूच झाली नाही. काही वेळाने नेते तसेच अधिकाऱ्यांची ई-बस परत आली. यावेळी त्यांच्याही लक्षात ही बाब आली. मात्र, त्याचा गवगवा होऊ नये म्हणून सर्व मुलांना सीएनजी बस मधून ई- बस मध्ये बसवित त्यांची समजूत घालत त्यांना ई-बसची रपेट घडविण्यात आली.
————————

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)