उदयनराजे-पवारांची गोविंदबागेत खलबते

सातारा,दि.5 (प्रतिनिधी)-

लोकसभा निवडणूकीपासून खा.उदयनराजे अन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार हे कायम एकत्र येताना दिसून येत आहेत. कराडच्या सभेत पवारांनी खा.उदयनराजेंची कॉलर उंचावली तर निकालानंतर दोघांनी एकत्रित दुष्काळ दौरा केला आणि आता शनिवारी थेट बारामतीच्या गोविंदबागेत खलबते झाल्याचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. विशेष बाब म्हणजे, छायाचित्रात तिसरा कोणी ही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे विशेषत: राष्ट्रवादीत आणि जिल्हावासियांमध्ये राजकीय चर्चांना उधाण येण्यास सुरूवात झाली आहे.

खा.उदयनराजेंनी शनिवारी बारामतीच्या गोविंदबागेत पवारांची भेट घेतली. भेटीनंतर काहीवेळातच छायाचित्र खा.उदयनराजे यांच्या व्टिट्‍र अकाऊंटवरून प्रसिध्द करण्यात आले. भेटी दरम्यान नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे नमूद करण्यात आले नाही. मात्र, यापुर्वी खा.उदयनराजे बारामतीच्या गोविंदबागेत गेल्याची माहिती समोर आलेली नव्हती. परंतु लोकसभा निवडणूकीपासून खा.उदयनराजे आणि पवार हे कायम एकत्र येताना दिसून येत आहेत.

कराडच्या सभेत पवारांनी खा.उदयनराजेंची कॉलर उंचावल्यापासूनच जिल्ह्यात राजकीय चर्चांचा जोर वाढला होता. त्यानंतर पवारांसोबत दुष्काळी दौरा आणि आता तर थेट बारामतीच्या गोविंदबागेत खलबते झाल्यामुळे विशेषत: राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. कारण, तीन दिवसांपुर्वी मुंबईत राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत खा.उदयनराजे प्रथमच पक्षाच्या व्यासपिठावर विराजमान झाल्याचे दिसून आले.

एवढेच नव्हे तर, खा.उदयनराजे आणि ना.रामराजे ना.निंबाळकर हे व्यासपिठावर शेजारी बसले होते. माढा लोकसभा मतदारसंघ खेचून आणण्यात ना.रामराजेंना यश मिळाले नाही तर साताऱ्याचा गड राखण्यात खा.उदयनराजेंना यश मिळाले. एकूणच सर्व घटनाक्रम आणि पवार व खा.उदयनराजेंची वाढती जवळीक पाहता सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सुत्रे खा.उदयनराजे यांच्याकडे सोपविण्याच्या चर्चांना उधान येण्यास सुरूवात झाली आहे.

राजे रायगडावर जाणार
गोविंदबागेतील फोटोसह खा.उदयनराजे हे रविवारी रायगडावर होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्यास जाणार, असे छायाचित्र देखील व्टिटर अकाऊंटवरून प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. परिणामी यंदाच्या वर्षी सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक मावळे रायगडावर पोहचण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.