उदयनराजेंच्या वादळापुढे भाजप व शिवेंद्रराजेंचीही कसोटी

सातारा- जावळी विधानसभेच्या रणांगणातील घडामोडींकडे आता राजकीय गोटाचे लक्ष

श्रीकांत कात्रे

सातारा, दि. 31 –

जिल्ह्यात बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला घायाळ करण्यात भाजपने बाजी मारली. सातारा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यापूर्वी त्यांच्या भाजप प्रवेशाची उलटसुलट चर्चा असताना जिल्ह्याच्या राजकारणाचे रंग ऐनवेळी बदलण्याची मुत्सद्देगिरी दाखविणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मौन पाळले. प्रवेश झाल्यावर आता उदयनराजे काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

त्यांचे मौन म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती. त्यांचे आक्रमण रोखण्यासाठी आता खरी भाजप आणि शिवेंद्रसिंहराजेंचीही कसोटी लागणार आहे. त्यामुळे सातारा- जावळी विधानसभेच्या रणांगणातील घडामोडींकडे आता राजकीय गटाचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनधरणी करुनही अखेर शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात भाजपने यश मिळविले. माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवेंद्रराजेंच्या मदतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकेक सत्तास्थाने खिळखिळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. मतदारसंघातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याठी भाजपमध्ये गेल्याचे शिवेंद्रराजे सांगत आहेत.

भाजप प्रवेशाचे ते एक कारण असू शकते. परंतु, तेव्हढे एकच कारण पुरेसे ठरत नाही. राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पंधरा वर्षे सत्ता असताना या कामांचा पाठपुरावा झाला असेलच. तरीही आताच हा उपाय सुचला, हे विशेष आहे. त्यामुळे पक्षांतर्गत कलह आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी असणारे सख्य ही आणखी काही कारणे या प्रवेशासाठी कारणीभूत आहेत. लोकसभा उमेदवारीच्या आधीपासून आणि नंतरही उदयनराजेंच्या संदर्भात शिवेंद्रराजे वेळोवेळी पक्षाकडे तक्रारी करत होते. मात्र, पक्षाने आणि नेतृत्वाने त्या त्यावेळी शिवेंद्रराजे यांना नमते घ्यायला भाग पाडले.

आता शिवेंद्रसिंहराजेंच्या विधानसभेची वेळ आली. उदयनराजेंच्या मदतीबद्दल शिवेंद्रसिंहराजेंच्या मनात शंका निर्माण झाल्याने पुन्हा नेत्यांकडे तक्रारी झाल्या तरीसुद्धा काहीच फरक पडत नसल्यामुळे अखेरचा इलाज म्हणून भाजपचा रस्ता त्यांनी धरला. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रवेशाची चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले. रामराजे व शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांच्यातील मतभेदांनी अनेकदा टोक गाठले. शरद पवार यांनी समझोत्याचे प्रयत्न करताना नेहमीच उदयनराजेंना झुकते माप दिल्याची भावना शिवेंद्रसिंहराजेंच्या मनात राहिली.

शरद पवारांनी मुंबईत बैठक घेऊन दिलजमाईचा प्रयत्न केला. पण मार्ग निघाला नाही. याउलट तुम्हाला भाजपमध्ये जायचे तर जा, माझ्यावर कशाला खापर फोडता, अशी भूमिका उदयनराजेंनी त्यावेळी घेतली होती. त्या बैठकीनंतर भाजप प्रवेशाच्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. शिवेंद्रसिंहराजें यांच्या मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्या भेटीगाठी वाढल्या. खलबते झाली. या सर्व काळात उदयनराजेंनी मौन पाळले.

ही शांतता वादळापूर्वीची ठरण्याची शक्‍यता आहे. त्याला नगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. आता आमदारही सर्वसामान्य असेल, ही उदयनराजेंची घोषणा कोणीही विसरलेली नाही. दोघांमधील संघर्षाचे ताणतणाव राजकारणानेच नव्हे तर शहरानेही अनुभवले आहेत. विकोपाला गेलेला हा संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा डोके वर काढण्याची शक्‍यता आहे.

 

खरी लढत आता दोन्ही राजांतच!
शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप प्रवेश उदयनराजेंच्या पथ्यावर पडणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधातही बोलणाऱ्या उदयनराजेंना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम अधिक जोमाने करावेसे वाटेल. त्यामुळे आता त्यांचे मौन सुटेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवेंद्रसिंहराजेंसमोर तगडा परंतु सर्वसामान्य उमेदवार रिंगणात आणला जाईल. शिवेंद्रराजेंचे सातारा आणि जावळी तालुक्‍यातील सध्याचे भलावण करणारे समर्थकही उदयनराजेंच्या एंट्रीनंतर कोणत्या पक्षाची साथ देतात, ते पाहवे लागेल. त्यामुळेच उदयनराजेंची आता होणारी एन्ट्री भाजप आणि शिवेंद्रसिंहराजे यांना आव्हानात्मक ठरु शकते. भाजपकडून आता सर्व प्रकारे मोठी ताकद लावली जाईल. शिवेंद्रसिंहराजे येण्याचा पुरेपुर फायदा घेऊन जिल्ह्यात आपले बस्तान वाढविण्यासाठी भाजप प्रयत्न करेल. दोन्हीही कॉंग्रेस कमकुवत करण्याच्या प्रयत्नात भाजपची कॉंग्रेस होणार हे लक्षातही येणार नाही. शिवेंद्रसिंहराजे आल्यामुळे भाजप जोरदार वाट चालेल. तरीही शिवेंद्रसिंहराजेंना सावधच खेळावे लागेल, कारण राष्ट्रवादीचा उमेदवार कोणीही असला तरी लढत शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांच्यातच होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.