उजनीतून नदीपात्रात पाणी सोडणे बंद

विभागीय आयुक्तांकडून सूचना ः आमदार भरणे यांची शिष्टाई यशस्वी

पळसदेव -इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची केवीलवाणी अवस्था पाहून आमदार दत्तात्रय भरणे यांनी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन इंदापूर तालुक्‍यात पाण्यासाठी होणारे शेतकऱ्याचे हाल सांगितले व उजनी धरणातून नदी पात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याची विनंती केली. आमदार भरणे यांनी मांडलेल्या परिस्तितीवरून विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी तातडीने उजनीतून विसर्ग होणारे पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या व आज (दि. 27) सायंकाळी सात वाजता उजनीतून नदीपात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले.

आमदार भरणे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांची देखील भेट घेऊन उजनी काठावरील शेतकऱ्याचे पाण्यासाठी होणारी पळापळ व होणारे आर्थिक नुकसान याची सविस्तर माहिती दिली. उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे उजनी बॅक वॉटरवरील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाणी योजना तसेच पिण्याच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर तीन-तीन विद्युत पंप लावूनही पाणी आणणेच शक्‍य नसल्याने हताश होऊन जळून जाणाऱ्या पिकाकडे बघून अक्षरशः हंबरडा फोडला; मात्र उजनीचे पाणी सोडणे सुरूच होते.

मात्र या निर्णयानंतर आता तालुयातील शेतकऱ्यांना काहीचा दिलासा मिळणार आहे. या वेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, अमोल भिसे, माजी सभापती दत्तात्रय शेंडे, ज्येष्ठ नेते किसनराव जावळे, दिवाणराव देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी इंदापूर तालुक्‍यातील उजनी बॅक वॉटरवरील विविध गावांतील सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या. यामुळे उजनी बॅक वॉटरवरील शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबतील. उजनी काठावर पाण्यासाठी शेतकऱ्याचा जीव जाणार नाही. किमान शेतकऱ्यांचा जीव वाचावा यासाठी उजनीतून सोडण्यात येणारे पाणी बंद करा ही मागणी सर्वानी लावून धरण्यात आली. परिस्तिथी ओळखून आयुक्तांनी तातडीने पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या. उजनीतून पाणी सोडायचे बंद केल्यानंतर शेतकऱ्यांनी अगदी फटाके फोडून आनंद व्यक्त केला व आमदार भरणे यांचे आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here