उजनीतील पाण्यासाठी ग्रामपंचायतींची कसरत

भिगवण – उजनी धरणातील पाणीसाठा उणे टक्‍क्‍यांवर गेला आहे. यामुळे उजनीवर अवलंबून असलेल्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. याभागातील गावे ही पुनर्वसित आहेत; त्याकाळी जे पाण्याचे स्त्रोत होते. ते पूर्ण बंद पडले आहेत. या भागात पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींना मोठी कसरत करावी लागत आहे.

याभागातील तक्रारवाडी, मदनवाडी, वीरवाडी, पोंधवडी, बंडगरवाडी, डिकसळ या गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता ग्रामपंचायतींना खर्चाचा भार उचलावा लागत आहे. या गावातील पाणी पुरवठा करणारे सर्व जुने स्त्रोत बंद पडले आहेत. त्यात आता उजनीतून सोलापुरला अद्यापही पाणी सोडले जात असल्याने या गावांना पाण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागत आहेत.

उजनीचे पाणी पूर्ण भिमानदीच्या पोटात गेले आहे. उजनीतील पाणी सोडण्याचे काम असेच सुरु राहिले तर, मे महिन्यात या गावांतून टॅंकरनेच पाणी पुरवठा करावा लागणार आहे. यामध्ये छोट्या ग्रामपंचायती पाण्यासाठी खर्च करुन आता मेटाकुटीस आल्या आहेत. या ग्रामपंचायतीकडे असणारा निधी जवळपास संपत आला आहे. त्यातच निवडणुकीच्या आचासंहितेमुळे सर्वच कामे ठप्प झाली आहेत.

पाणी पुरवठ्याबाबत तक्रारवाडीच्या सरपंच शोभा वाघ म्हणाल्या की, गावच्या पाणी पुरवठा विहीरीची पाणी पातळी गेल्या महिन्यांतच कमी झाली आहे. उजनीवरुन (जुन्या तक्रारवाडी पासुन) पाणी उचलले जाते, लोकांना पिण्यास पाणी मिळत असले तरी पाणी आणताना मोठी कसरत होत आहे. उजनीचे पाणी झपाट्याने खाली जात आहे. यामुळे पाणी उचलणे अवघड जात आहे. त्यातूनही पाणी उचलण्याचा प्रयत्न केला तर नदीकिनारी वीज उपलब्ध होत नाही. नदीपात्रात गाळ इतक्‍या मोठ्या प्रमाणात साचला आहे की, पाण्यापर्यंत पोहचू शकत नाही, अशी स्थितीतही पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, उजनीतून सोलापुरसाठी पाणी सोडले जात असल्याने धरणातच पाणी राहिले नाही तर मात्र परिस्थिती अवघड होणार आहे.

भिगवण पासुन भिमानदी 5 ते 6 कि.मी. अंतरावर आहे. एवढ्या लांब पाणी पाजण्यासाठी जनावरे घेऊन गेले तरी मोठ्या प्रमाणात गाळाचे प्रमाण असल्याने जनावरांना पाणी पिता येत नाही. एखादे जनावर पाण्याच्या ओढीने पुढे गेलेच तर गाळात रुतून बसते. जिल्ह्याच्या वरील धरणांतून पाणी सोडण्यात आले होते. त्याचेवेळी अभ्यास करुन सोलापुरला पाणी सोडणे गरजेचे होते. पण, तसे नियोजनच झाले नाही. यामुळे भागातील पाणलोट क्षेत्रातील शेती पंप उघडे पडु लागले आहेत. परिणामी या भागातील शेतकऱ्यांची उभी पिकेही धोक्‍यात आली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.