उजनीची मायनस वाटचाल जोरात

शेतकऱ्यांच्या जीवाला घोर : 32.53 टक्‍के पाणीसाठा

रेडा- उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे महाकाय धरण उघडे पडलेले भकास दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात 110 टक्‍के भरलेले धरण सात महिन्यांत मायनस 32.53 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या संकटाला सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गावे कासावीस होणार आहेत. शेतकरी आणि नागरिकांना अजून दोन महिने जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोलासह अनेक शहरांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत आहे.

यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेले आहे. दररोज एक टक्‍का उजनी धरणातील पाणी कमी होत असून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने भूजलपातळी खालावली आहे. विहिरी व बोअरवेलने मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन काटकसरीने करावे लागणार आहे. कालवा व बोगद्याचे तोंड बंद पडले आहे. आता पाणीच नसल्यामुळे कालवा बोगदाकाठच्या शेतकऱ्यांची पिके धोक्‍यात आली आहेत. आता पाऊस पडल्यानंतर धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे.

उजनीची पाणीपातळी 488.180 मीटर आहे. एकूण पाणीसाठा 1309.28 दलघफूमी इतके आहे. त्यात धरणातील उपयुक्‍त पाणीसाठा मायनस 493.53 दलघफूमी आहे. एकूण पाणीसाठा टीएमसी 46.23 आहे. तर उपयुक्‍त मायनस 17. 43 टीएमसी आहे. गेल्यावर्षी आजच्यादिवशी उजनीत पाणीसाठा प्लस 21.83 टक्‍के होता. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या गावे आणि शहरांची भर पडणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.