उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाणे धोक्‍याचे

पिंपरी – शहरात पावसाळ्यामुळे काही भागात डबके साचले असून त्यामुळे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये उघड्यावर ठेवलेल्या खाद्य पदार्थामुळे आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे चित्र शहरात दिसून येत असून उघड्‌यावरचे खाद्य पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.

नेहरूनगर, संत तुकारामनगर, पिंपरी चौक, चिंचवड स्टेशन, भोसरी, चिखली, निगडी आदी मोक्‍याच्या आणि गर्दी असलेल्या ठिकाणी अनेक हॉटेल्स आणि टपऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये अन्न पदार्थ टेबलवर ठेवले जातात. अन्न पदार्थाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विक्रेत्यांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. त्यामुळे उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थांवर माश्‍या घोंगावत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरची धुळ देखील पदार्थांवर बसत आहे. विक्रेत्यांना कोणाचीच आडकाठी नसल्याने सर्रासपणे खाद्यपदार्थ उघड्यावर विकत आहे. हेच पदार्थ नागरिक खात असल्यामुळे त्यांना त्यापासून हगवण, कॉलरा, पोटदुखी होण्याचे आजार बळावत आहे. परंतु, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे आजार पसरण्याची शक्‍यता जास्त असते. त्यात जास्तीत जास्त रूग्ण हे उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे आजारी पडतात. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यास पचन संस्थेशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणात वाढतात. परंतु, नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने कुठलेही जनजागृतीचे कार्यक्रम होतांना दिसत नाहीत. जनजागृतीचे कार्यक्रम झाल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे उघड्या जागेवर खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच जनजागृती होण्याची मागणी होत आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांनी शक्‍यतो बाहेरचे खाद्य पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित आजार उद्‌भवतात. त्यामध्ये डायरीया, लुझ मोशन, कॉलरा, कावीळ, आणि पोट दुखीसारखे आजार होतात. अशा दिवसात शक्‍यतो बाहेरचे पाणी पिणे आणि उघड्यावरचे खाणे टाळले पाहिजे. कारण बाहेरचे पाणी दूषित असते. तर खाद्य पदार्थावर येणाऱ्या माशा या अस्वच्छतेमुळे येतात. या दोन कारणामुळेच आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. हवा थंड असल्यामुळे सर्दी, खोकला असे आजार होतात. त्यामुळे या दिवसात अतिशय गरम व उघड्यावरचे खाणे टाळावे. पाणी उकळून पिणे अधिकच चांगले.
– डॉ. सुनिता काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)