उगाच आशेला लावून जीव घेउ नका – राज ठाकरे

मुंबई – झेपत नसेल तर सत्तेतून पायऊतार व्हा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण कसे असेल, कायद्याच्या कोणत्या चौकटीत दिले जाईल, अशा सर्व बाबींवर भूमिका मांडा. नाहीतर उगाच आशा लावून लोकांचे जीव घेऊ नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

राज म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते. मात्र काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडले. अर्थात असे असले तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की यापुढे एकाही “मराठी’, मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल, कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला “मराठी’ म्हणून ते परवडणारे नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच सरकारने वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्‍या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात.

दुसरीकडे सरकारला “शांतता आणि सुव्यवस्था” सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्यांची बेजबाबदार विधाने याची साक्ष देतात. आता पुन्हा काही आश्वासने देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचे कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे. वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचे काय काम?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)