ईव्हीएम मशिन्स टीका आणि वास्तव (भाग- १)

गेल्या काही वर्षात मतदानासाठी पोलिंग मशीन्सचा (ईव्हीएम) वापर वाढत्या प्रमाणावर केला जात आहे. आणि तो वाढतच राहणार आहे. मात्र त्याचबरोबर पोलिंग मशीन्सवर होणाऱ्या टीकेतही वाढ होताना दिसत आहे. पोलिंग मशीन्सवरचा विश्‍वास उडून जावा अशा प्रकारची टीका विरोधी पक्ष करत असतात. त्यात सत्य काय आणि असत्य काय हा संशोधनाचा विषय आहे. पण ही टीका अनेकदा एकतर्फी आणि केवळ टीकेसाठी म्हणूनच केलेली असते. मतदान प्रक्रियेत मशीन्स इतकाच, किंबहुना थोडा जास्तच वाटा माणसांचा असतो. या पद्धतीविषययी आपण थोडी माहिती घेऊ या.

संविधान कलम 324 नुसार निवडणुकांचे आयोजन केले जाते. निवडणुकांचे कामकाज करण्यासाठी सरकारी कर्मचारी व अधिकारी वर्गाची नियुक्‍ती केली जाते. लोकप्रतिनिधत्व कायदा 1951 मधील तरतुदीनुसार शासकीय सेवक व अधिकारी निवडणूक कामाकरिता प्रतिनियुक्‍तीवर नेमले जातात. 1951पासून ते आजपर्यंत निवडणूक आयोगाकडे निवडणूक कामाकरिता स्वतंत्र व कायमस्वरूपी सेवकवर्ग नाही. मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, निवडणुका घेणे, निकाल जाहीर करणे इत्यादी प्रक्रिया या प्रतिनियुक्‍तीवर नेमलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत केल्या जातात.

निवडणूक प्रक्रिया/कार्यपध्दतीवर एक नजर-
भारतामध्ये एकूण 543 मतदार संघ आहेत.
1951 साली पहिली निवडणूक झाली त्यामध्ये 10 कोटी 60 लाख मतदान झाले. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण मतदान 55 कोटी 38 लाख झाले.
2014 साली 9,30,000 मतदान केंद्रे होती. प्रत्येक मतदान केंद्रात एकूण 5 कर्मचारी व एक संरक्षण कर्मचारी असतात. असे एकूण 46 लाख 50 हजार कर्मचारी कार्यरत होते.
1987 साली प्रथम मतदान यंत्राचा (ईव्हीएम) वापर भारतामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये यशस्वीरीत्या केला गेला.
मतपत्रिकेचा वापर केल्यास एका मतदारास मतदानास किमान चार मिनिटे वेळ लागतो. आणि मतदान यंत्रांचा वापर केल्यास फक्त दोन मिनिटे वेळ लागतो. म्हणजे वेळेत 50 टक्के बचत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मतदान यंत्रामुळे कागदाची बचत होते. एका राज्यात 2009 च्या निवडणुकीत 7 लाख टन कागदाची बचत झाली होती, याच राज्यात 2014 च्या निवडणूकीत 7.82 लाख टन कागदाची बचत झाली. यामुळे राष्ट्रीय/नैसर्गिक संपत्तीची बचत झाली. आर्थिक खर्चातही बचत झाली. परदेशामध्ये 4,000 भारतीय बनावटीची मतदान यंत्रे निवडणुकीकरिता वापरण्यात आली होती. जगभरातील एकूण 92 राष्ट्रांनी भारताबरोबर निवडणूक प्रशासनविषयक सामंजस्य करार केलेले आहेत.

निवडणूक प्रशिक्षणाचे स्थळ, मतदान केंद्र, मूळ नियुक्‍त कार्यालय, सेवकांचे निवासस्थान यामध्ये किमान एक ते अडीच तास प्रवासाचे अंतर असते. शहरी भागातील लोकसंख्या, वाहतूक, गर्दी व निवडणूक कामाचा ताण अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कॉल सेंटरप्रमाणे मिनी-बस अथवा तत्सम वाहन उपलब्ध करून दिले पाहिजे. शहरी वाहतुकीच्या ताणाचा परिणामही कर्मचाऱ्यांवर होत असतो. विधानसभा व लोकसभेच्यावेळी या प्रश्‍नास वेगळ्याच प्रकारे सामोरे जावे लागते.

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाआधी, मतदानाच्या दिवशी व नंतर अशा एकूण दोन ते अडीच दिवस सलग काम करावे लागते. इथेही कामाच्या तासांचे उल्लंघन होते. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सोळा तासांपेक्षा अधिक काळ काम करावे लागते. मॉकपोल सकाळी 6 वाजता करावयचा असल्याने पहाटे 4.30 ते 5.45 या कालावधीत कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या आवारात थंड पाण्याने आंघोळ, तीही स्वच्छतागृहात करावी लागते. मतदानाचे दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 पर्यंत लघुशंका व शौचास जाण्यासाठीही वेळ नसतो. एक प्रकारे सेवकांच्या नैसर्गिक विधीवर आयोगामार्फत नियंत्रणच आणले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)