ईव्हीएम मशिन्स टीका आणि वास्तव (भाग- २)

निवडणुकीच्या कामाचा योग्य मेहनतानाही दिला जात नाही. निवडणूक आयोगाचा स्वतःचा सेवक असता, तर त्याला महिन्यास किमान 18 हजार रुपये म्हणजे प्रत्येक दिवसाला रू. 600 वेतन द्यावे लागले असते.याचा अर्थ निवडणुकीच्या कामाचे त्या सेवकास रू. 2400 मिळाले असते. परंतु प्रतिनियुक्‍तीवर असलेल्या सेवकांना दोन दिवस प्रशिक्षण, दोन दिवस प्रत्यक्ष निवडणुकीचे काम याचे एकूण मानधन रू. 1300 दिले जाते. या 1300 रुपयांमध्ये चार दिवसांचा स्वतःच्या दुचाकीचा पेट्रोल खर्च रू. 180, तीन वेळ जेवणाचा खर्च रू. 180, एक वेळ नास्ता रू. 30, दोन दिवसांचा चार वेळचा चहा रू. 40, पिण्याचे पाणी दोन दिवसांकरता 5 बाटल्या रू. 100 असा एकूण रू. 530 खर्च होत असतो. हा एकूण खर्च वजा जाता या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये निव्वळ मानधन रू. 770/- मिळते.

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम 38 ते 40 अंश सेल्सीअस तापमानात फिरून करावे लागते. त्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातात. कर्मचाऱ्यांना त्या परिसराचा अनुभव नसताना त्यांना भर उन्हात काम करण्यास भाग पाडले जाते. प्रशासकीय सेवकांनी जमा केलेली माहिती शासनाकडे किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतर त्यांचे संकलन व छपाई व्यवस्थित न झाल्यास कर्मचाऱ्यांना ते पुन्हा दिले जाते. ही सर्व कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे त्या काळात प्रलंबित राहिलेले मूळ नियुक्‍ती कार्यालयाचे काम नंतर पूर्ण करावेच लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मतदार याद्या अद्ययावत केल्यानंतर निवडणुकीचे काम, नंतर आर्थिक जनगणनेचे काम, नंतर जातनिहाय जनगणनेचे काम याच सेवकांना करावे लागते. भारतातील 134 कोटी जनतेकरिता 5 वर्षे लोकशाही अबाधित राखण्यासाठी काम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे मानधन फक्‍त रू. 1300 असते. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील ही आवश्‍यक माहिती घेतल्यानंतर आता ट्रोलिंगकडे वळू ट्रोलिंग म्हणजे एखाद्या गोष्टीवर नको त्या कमेंटस्‌ करून एखाद्याचे खच्चीकरण करणे. ट्रोल करणारा फक्‍त समोरच्यांची गंमत पहात असतो. ट्रोलिंग हा प्रकार साधारणतः यू-ट्यूब, फेसबुक, व्हिडिओ अपलोड, कमेंटस्‌ इत्यादींबाबत वापरला जातो.

ईव्हीएम मशीन म्हणजे बळीचा बकरा
निवडणुका जवळ आल्या किंवा त्या होऊन गेल्या की पक्षांच्या, गटांच्या, समूहांच्या, विरोधकांच्या कार्यक्रम पत्रिकेतील (अजेंडा) पहिला मुद्दा असतो निवडणूक प्रक्रियेत वापरले जाणारे मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम मशीन. यशस्वी उमेदवार मतदान यंत्राबद्दल चांगले उद्‌गार काढतात, तर पराभूत उमेदवार मतदान यंत्रावर सरळ सरळ टीका करतात. हल्ली या मतदान यंत्रांचं सर्रास राजकारण केले जात आहे. राज्यकर्ते आणि विरोधक मतदान यंत्राचा विषय घेऊन एकमेकांवर हल्लाबोल करतात. त्याचे रूपांतर उपोषणे, संप, मोर्चे, रास्ता रोको, आंदोलने इत्यादी प्रकारात होते. 2009 ते 2018 या कालावधीत तार याची तीव्रता फारच वाढली आहे. परंतु त्याच वेळी याची दुसरी बाजू असलेला निवडणुकीत काम करणारा कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याबद्दल एखादे वाक्‍यही बोलले जात नाही.

त्यांच्या समस्या तर दूरच राहोत. त्यांना निवडणूकीच्या कामात येणारा ताणतणाव, सवलती, सुविधा यांचा कोणी विचार करेल का? लोकप्रतिनिधी केवळ जनतेचा वोटींग बॅंक म्हणून वापर करतात की काय? आणि निवडणूक कर्मचारी म्हणजे जनता नव्हे काय? लोकप्रतिनिधी जर सर्व जनता, व्यवस्था (सरकारी खाते) यांचेवर निगराणी ठेवतात, तर निवडणूक कर्मचाऱ्यांबद्दल कोणतेही प्रश्‍न का लक्षात घेतले जात नाहीत? निवडणुकीचे काम करणाऱ्या 46 लाख 50 हजार कर्मचाऱ्यांचा एखादा मतदारसंघ असता तर त्यावर लोकप्रतिनिधींनी/निवडणुकीतील उमेदवारांनी भाष्य किंवा संवेदना दर्शविल्या असत्या.

सन 1952 ते 2000 या कालावधीत निवडणूक कामाबाबत अ) मुख्यमंत्री एन.टी.रामाराव समिती, ब) 1957 चा निवडणूक आयोग, क) जगन्नाथ राव समिती-1971-72, ड) न्यायाधीश बी.एम. तारकुंडे समिती, इ) दिनेश गोस्वामी समिती, फ) टी.एन. शेषन समिती, ल) एम.एस. गिल समिती यांनी सुचविलेल्या सुधारणा आजपर्यंत अमलात आणल्या गेल्या नाहीत. निवडणूक प्रशासन विषयक पीएच.डी. सारख्या संशोधनाबाबत “अशा संशोधनाचा उपयोग नाही’ अशी भूमिका घेतली जाते. शासकीय संशोधन संस्था, विद्यापीठ अनुदान आयोग यांचेकडे निवडणूक प्रशासन विषयक संशोधन प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्या संशोधनास मंजुरी अथवा नामंजुरी का नाही? की त्यास कचऱ्याची टोपली दाखविली गेली? या सर्व परिस्थितीचा विचार केला, तर निवडणूक प्रक्रिया, त्यासंबंधी प्रशासकीय व्यवस्था यांचे कौतुक करण्याऐवजी मतदान यंत्रांचे माध्यम वापरून ट्रोलिंग करणे कितपत योग्य आहे ?

डॉ. निवृत्ती निकाळजे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)