अग्रलेख | ईव्हीएमचा संशयकल्लोळ

निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. टी. एन. शेषन यांनी निवडणूक आयोगाला किती अधिकार असतात आणि तो निःपक्षपाती वागला, तर भल्याभल्यांना कशी धडकी भरवू शकतो, हे दाखवून दिले होते. परंतु त्यानंतर आलेल्या निवडणूक आयुक्‍तांपैकी फारच थोड्यांनी शेषन यांचा वारसा चालविला. निवडणूक निःपक्ष वातावरणात आणि कोणताही अडथळा न येता पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते; परंतु आता ही जबाबदारी पार पाडण्यात निवडणूक आयोगाला अपयश येत आहे. त्याचे कारण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही निवृत्तीनंतर कुठेतरी वर्णी लावून घेण्याची घाई झालेली असते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे भोई असल्यासारखे अधिकारी वागतात. त्याचा परिणाम निवडणूक आयोगाच्या विश्‍वासार्हतेवर होत आहे.

पालघर मतदारसंघात सुमारे 400 तर भंडारा-गोंदिया मतदारसंघात 500 ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. पालघर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीवेळी जाणीवपूर्वक मशीन बंद पाडल्याचा आरोप कॉंग्रेससह विरोधकांनी केला आहे. भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मतदानयंत्रांच्या गोंधळाला तोंड फोडताना गुजरातमधील सूरतहून मतदानयंत्रे आणल्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

सत्ताधारी पक्षाला पूरक भूमिका घेण्याचे काम निवडणूक आयोग करीत असल्याचा आरोप करण्याची संधी, या आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच विरोधकांना दिली आहे. ईव्हीएम मशीन बंद पडतात. त्यालाही काही आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही; परंतु ईव्हीएम मशीन बंद पडण्याची संख्या जास्त असेल, तर मात्र नक्कीच आक्षेप घ्यावा लागतो. मतदानापूर्वी ईव्हीएमची चाचणी घेतली जात असते. ती रॅंडम असते. भारतीय हवामानाचा विचार करून ईव्हीएम मशीन बनविलेली असतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतूंचा मशीनवर परिणाम व्हायला नको. परंतु आता जे चित्र पुढे आले आहे ते चिंताजनक आहे. त्यातही निवडणूक आयोगाने “उन्हाचे कारण’ दाखवून मशीन बंद पडत असल्याचे जे कारण दिले आहे, ते नक्कीच पटण्यासारखे नाही. विरोधकांच्या हाती आयते कोलित देण्याचा प्रकार निवडणूक आयोगाने केला आहे. यापूर्वीही दिल्लीतील “आम आदमी’ पक्षाच्या आमदारांना लाभाच्या पदावरून अपात्र ठरविण्याची कारवाई करताना त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे निवडणूक आयोगाला वाटले नव्हते. त्यामुळे जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तेव्हा निवडणूक आयोगावर ताशेरे झाडले गेले होते. निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करता कामा नये. परंतु आयोगाच्या अधिकाऱ्यांचे सध्याचे वागणे संशयास्पद वाटायला लागले आहे. कर्नाटकच्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाच्या अगोदर भाजपच्या प्रवक्‍त्यांना कळतात, हे सारेच अनाकलनीय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभेच्या मतदानादरम्यान काही ईव्हीएम मशिन्स खराब झाल्याच्या घटना घडल्या. या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे. कडक उन्हामुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या अधिकाऱ्याच्या स्पष्टीकरणाचा अखिलेश यांनी चांगलाच समाचार घेतला. “आज उन्हामुळे ईव्हीएम काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे ईव्हीएम काम करीत नाहीत, असे अधिकारी सांगतील’, हे यादव यांचे म्हणणे हसण्यावारी नेण्यासारखे नाही. मुळात गोंदिया-भंडारा, पालघर, कैराना मतदारसंघातून ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या, त्या सकाळी साडेनऊच्या आसपासच्या होत्या. उन्हाचा परिणाम व्हायचा असता, तर दुपारी बारा ते सायंकाळी चार दरम्यानच्या उन्हामुळे व्हायला हवा होता.

प्रत्यक्षात तसे झालेले नाही. उन्हाचा ईव्हीएम मशीनवर परिणाम होत असेल, तर मग उन्हाळ्यात निवडणूक घ्यायला नकोत. लोकसभेच्या निवडणुका तर मार्च ते मे या ऐन उन्हाच्या काळात होत असतात. अशा वेळी निवडणूक आयोगाकडे पर्यायी यंत्रणा आहे का? कडक उन्हामुळे व्हीव्हीपॅट खराब होत आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्‍त एल. वेंकटेश्‍वरलू यांनी सोमवारी म्हटले होते. “जेवढ्या तक्रारी करण्यात आल्या, तेवढे गांभीर्य नाही’, असे सांगितले जात होते. मग इतक्‍या जागी पुन्हा फेरमतदान घेण्याची आवश्‍यकता निवडणूक आयोगाला का वाटली? पालघर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीवेळी जाणीवपूर्वक मशीन बंद पाडल्याचा आरोप कॉंग्रेससह विरोधकांनी केला आहे. आयोगाने मात्र तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद पडले, तरी ते तातडीने बदलण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याचे स्पष्ट केले. तरी फेरमतदान घेण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगाचे म्हणणे अर्धसत्य आहे. ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपीएटी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचे कैराना मतदारसंघातील राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांनी निवडणूक आयोगाला कळविले आहे.

पालघर मतदारसंघात सुमारे 400 तर भंडारा-गोंदिया मतदारसंघात 500 ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. पालघर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीवेळी जाणीवपूर्वक मशीन बंद पाडल्याचा आरोप कॉंग्रेससह विरोधकांनी केला आहे. भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मतदानयंत्रांच्या गोंधळाला तोंड फोडताना गुजरातमधील सूरतहून मतदानयंत्रे आणल्यासंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. भाजपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनुसार 197 ठिकाणी गोंधळ झाला. पालघरमध्येही मतदानानंतर एका खासगी वाहनातून मतदानयंत्रे नेण्याचा अत्यंत गंभीर प्रकार निदर्शनास आला. मतदानयंत्रांबद्दलचा गोंधळ वाढत असताना निवडणूक आयोग मात्र थातूरमातूर खुलासे करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. निवडणूक आयोगसुद्धा लोकांच्या मनातील शंका दूर करून लोकशाही प्रक्रियेसंदर्भातील विश्‍वास दृढ करण्याऐवजी राजकीय पक्षाप्रमाणे युक्तिवाद करताना दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)