ईएलएसएस योजनांमध्ये गुंतवणूक करताना…

नुकताच मार्च महिना संपलेला आहे. नोकरदारांना कर बचतीसाठी बरीच धावपळ करावी लागलेली आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च आला की, नोकरदारांपुढे टॅक्‍सचे आकडे दिसू लागतात आणि मग धावपळ सुरू होते. मग टॅक्‍स कट होऊन तुटपुंजी रक्कम हाती पडते. मार्च-एप्रिल महिन्यात फारच आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. एकरकमी टॅक्‍स भरावा लागलेला असतो किंवा कर वाचवण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागलेली असते.

कसेही केले तरी आर्थिक ताण आलेलाच असतो. हे टाळण्यासाठी लगेच एप्रिलच्या पगारापासून टॅक्‍स सेव्हिंग फंडामध्ये दर महिन्याची एसआयपी करण्याचा निर्णय आपण घेतो, पण एप्रिलमधील आर्थिक तंगी पाहता आपल्या हातून एप्रिलऐवजी मे महिन्यापर्यंत निर्णय पुढे ढकलला जातो. त्याची पुढच्या फेब्रुवारीपर्यंत आठवण येत नाही. त्यामुळे इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) मध्ये तुम्ही एसआयपी सुरू केली नसेल तर तुमच्या संभाव्य प्राप्तीकराचा अंदाज घेऊन दरमहा गुंतवणुकीला सुरुवात करा.

त्याचबरोबर केवळ ईएलएसएसमध्ये गुंतवणूक केली आणि कर वाचला म्हणून समाधान मानण्यापेक्षा कर वाचवण्याबरोबरच चांगला परतावा देणाऱ्या योजनेची निवड करा. ईएलएसएस फंडात गुंतवणूक करताना कोणत्या चुका टाळाव्यात याची आज आपण माहिती घेऊ. कारण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काय करायचे नाही याची माहिती असणे जास्त गरजेचे असते.

उशीर करू नका – कर वाचवण्यासाठी ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करण्यास उशीर करू नका. नवीन आर्थिक वर्षात ईएलएसएसमध्ये दरमहा ठराविक रकमेची एसआयपी चालू महिन्यापासूनच सुरू झाली पाहिजे. कर वाचवणाऱ्या म्युच्युअल फंडात एसआयपी किंवा एसटीपीद्वारे जास्तीत जास्त परतावा मिळेल या दृष्टीने दरमहा नियमितपणे गुंतवणूक करा. त्याचबरोबर नव्या आर्थिक वर्षात तुमच्यासाठी माहिती घेण्यासाठी वेळ हाती असल्याने आर्थिक सल्लागारच्या मदतीने योग्य फंड योजनेची निवड करा. जर तुम्ही चुकीच्या फंड योजनेची केली तर पुढील किमान तीन वर्षे तुम्हाला त्यात बदल करणे शक्‍य होणार नसते.

कमी काळातील कामगिरीवरून योजनेची पारख करून नका – हा मुद्दा केवळ ईएलएसएस योजनांनाच नव्हे तर म्युच्युअल फंडातील सगळ्या योजनांना लागू होतो. एखाद्या योजनेच्या एक वर्षाच्या किंवा सहा महिन्यातील कामगिरीवरून किंवा परताव्यावरून तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचा निर्णय घेणे योग्य ठरत नाही. तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करणार आहात त्या योजनेने गेले किमान पाच वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी केलेली असणे आवश्‍यक आहे.

केवळ परताव्याकडे पाहू नका – जेव्हा तुम्ही ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करता तेव्हा कर वाचवण्याबरोबरच परतावा हे गुंतवणूकदाराचे प्राथमिक लक्ष असते. परताव्याबरोबरच तुमच्या दृष्टिकोनाशी त्या योजनेचे गुंतवणूक तत्वज्ञान मिळतेजुळते आहे का? उदाहरणार्थ, चांगली कामगिरी करणाऱ्या योजनांच्या यादीत वरच्या स्थानावर राहण्यासाठी ज्या योजनांचे व्यवस्थापक मोठी जोखीम घेत असतील ती योजना पारंपरिक विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लगेच पचनी पडणारी नसते. असा गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीसाठी पारंपरिक शैली अंगीकारणाऱ्या योजना योग्य ठरतात.

लाभांशाच्या सापळ्यात अडकू नका – अनेक गुंतवणूकदार ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा ते लाभांशाकडे आकर्षित होतात. वस्तुस्थिती अशी असते की, तुम्हाला तुमच्याच पैशातून लाभांश दिला जातो. जर तुम्हाला लगेच नियमित उत्पन्नाची गरज नसेल तर लाभांश पर्याय निवडू नका. जर तुम्हाला संपत्ती निर्माण करायची असेल तर वाढीचा (ग्रोथ) पर्याय निवडा.

केवळ कर बचतीसाठी गुंतवणूक करू नका – ईएलएसएस योजनेतील गुंतवणुकीमुळे तुमचा कर वाचत असला तरी त्या शेवटी इक्विटी योजना असतात. त्यामुळे या योजनांमध्ये जोखीम असते आणि त्याचबरोबर चांगल्या परताव्याचीदेखील शक्‍यता असते. त्यामुळे कर वाचवण्यासाठी तुम्ही ईएलएसएस सारख्या योजनेची निवड करता तेव्हा गुंतवणुकीचा लॉक-इन कालावधी, जोखीम, परतावा या सगळ्यांचा विचार करा.

लॉक-इन कालावधीनंतर रक्कम काढण्याची घाई करू नका – ईएलएसएसमध्ये तुम्हाला गुंतवणुकीनंतर तीन वर्षे रक्कम काढता येत नाही. त्यामुळे काही गुंतवणूकदार लॉक-इन कालावधी संपताच पैसे काढून घेतात. चांगली कामगिरी करणाऱ्या योजनेमधून पैसे काढण्याची घाई करण्याचे कारणच नसते. तुम्ही ईएलएसएस योजनेमध्ये गुंतवणूक करता तेव्हा कमीतकमी पाच ते सात वर्षे गुंतवणूक ठेवण्याची मनाची तयारी करा. कारण ईएलएसएसद्वारे तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असता. त्यामुळे या असेट क्‍लासमध्ये गुंतवणूक दीर्घकाळासाठी ठेवण्याची गरज असते.

दर तीन वर्षांनी फंडात बदल करू नका – काही गुंतवणूकदार लॉक-इन कालावधी संपेपर्यंत थांबलेले असतात आणि तो संपला की दुसऱ्या कंपनीच्या ईएलएसएसमध्ये उडी मारतात. तुम्ही गुंतवणूक केलेली योजना चांगली कामगिरी करत नसेल तर लगेच गुंतवणूक काढण्याची गरज नसते. योजनेच्या आकारापासून अनेक गोष्टींवर परतावा अवलंबून असतो. मार्केटची दमदार वाटचाल सुरू असताना तुम्ही गुंतवणूक केलेल्या योजनेची जर कामगिरी दीर्घकाळ चांगली होत नसेल तर योजनेत टिकून राहण्याच्या तुमच्या निर्णयाचा तुम्ही विचार करावा.

अनेक ईएलएसएस योजनांमध्ये गुंतवणूक करू नका – काही गुंतवणूकदार दरवर्षी नव्या ईएलएसएस योजनेत गुंतवणूक सुरू करतात. त्यातून मग तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ सांभाळणे अवघड होते. जेव्हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक ईएलएसएस योजना असतात तेव्हा या अतिरेकी बहुविधतेमुळे भविष्यात गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)